Pregnant | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Fake Pregnancy Scam Exposed in Nigeria: साधारणपणे महिलांचा गर्भावस्थेचा कालावधी सुमारे 9 महिने असतो. पण नायजेरियामध्ये (Nigeria) असे एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका महिलेने दावा केला आहे की, ती सुमारे 15 महिने गर्भवती राहिली होती. यामागे मोठा घोटाळा असल्याचा संशय अधिकारी व डॉक्टर व्यक्त करत आहेत. यामागची कारणे तपासली जात आहेत. या घोटाळ्यात मुलांची तस्करी केली जात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिओमा नावाची ही महिला ‘होप’ नावाचे मूल तिचे आहे यावर ठाम आहे. सुमारे 15 महिने गरोदर राहिल्यानंतर तिने आपण होपला जन्म दिल्याचे सांगितले. मात्र अधिकाऱ्यांचा तिच्यावर विश्वास नाही.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, नायजेरियातील या घोटाळ्याची चौकशी केली जात आहे. सरकारी अधिकारी या महिलेशी सहमत नाहीत आणि असा दावा करणे ही सामान्य बाब नाही असे त्यांचे मत आहे. सरकारी अधिकारी होप हे चिओमाचे जैविक मूल असल्याचे मान्य करत नाहीत. मात्र चिओमा आणि तिचा नवरा इके यांनी दावा केला आहे की, होप त्यांचेच मुल आहे. चिओमाचा दावा आहे की तिने मुलाला 15 महिने आपल्या पोटात वाढवले होते.

चिओमा म्हणते की, तिला आठ वर्षांपासून मूल होत नव्हते. तिला गर्भधारणेसाठी इकेच्या कुटुंबाकडून दबाव होता. निराशेच्या अवस्थेत ती एका 'क्लिनिक'मध्ये गेली जी अपारंपरिक 'उपचार' देत होती. त्या ठिकाणी तिने उपचार घेतले आणि तिला 15 महिन्यांनी मुल झाले. मात्र हा एक घोटाळा असून, ज्यामध्ये माता बनण्यासाठी आतुर असलेल्या स्त्रियांना शिकार बनवले जाते. यामध्ये लहान मुलांची तस्करी समाविष्ट आहे, असे अधिकारी म्हणतात.

प्रशासन या गुप्त गर्भधारणा घोटाळ्याची चौकशी करत आहेत. अहवालानुसार, घोटाळेबाज महिलांना खात्री पटवून देतात की त्यांच्याकडे ‘चमत्कारिक प्रजनन उपचार’ आहे आणि ते महिलांना गर्भवती होण्याची हमी देतात. यामध्ये प्रारंभिक उपचारासाठी शेकडो डॉलर्स घेतले जातात. त्यानंतर पुढील उपचारासाठी अजून पैसे उकळले जातात. हे उपचार नक्की काय आहेत, हे कुठल्याच महिलेला माहित नाही. परंतु काही महिलांनी सांगितले की, या औषधांनी त्यांच्या शरीरात बदल घडून आले- जसे की पोट सुजणे- ज्यामुळे त्यांना खात्री पटली की त्या गर्भवती आहेत. (हेही वाचा: Sex Tourism: वाढत्या गरिबीमुळे जपानी महिला निवडत आहेत देहव्यापाराचा मार्ग; Tokyo बनत आहे 'सेक्स टुरिझम' हब)

हे घोटाळेबाज महिलांना इतर कोणत्याही डॉक्टरांना भेटण्यास मनाई करतात. त्यांनी अशीच चिओमाची फसवणूक केली आणि 15 महिन्यांनतर प्रसूतीनंतर तिला तस्करी केलेले बाळ देण्यात आल्याचे, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत तपास सुरु आहे. दरम्यान, नायजेरियामध्ये जगातील सर्वात जास्त जन्मदर आहे, जिथे महिलांना गर्भधारणेसाठी सामाजिक दबावाचा सामना करावा लागतो आणि ते करू शकत नसल्यास बहिष्कार किंवा अत्याचाराचा सामना करतात. या दबावाखाली काही महिला मातृत्वाचे स्वप्न साकार करण्यासाठी टोकाला जातात. घोटाळेबाज डॉक्टर किंवा परिचारिका म्हणून महिलांना खात्री पटवून देतात की त्यांच्याकडे गर्भवती होण्याची हमी 'चमत्कार प्रजनन उपचार' आहे. अशा प्रकारे ते फसवे धंदे करतात.