Fact Checked | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Fact Checked: जगभरातील प्रसारमाध्यमांमधून एक वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हे वृत्त एका दाम्पत्याच्या घटस्फोटाबाबतचे आहे. या घटस्फोटामागचे कारण काहीसे विचित्र आणि मानवी स्वभावातला विक्षिप्तपणा दर्शवणारे आहे. त्यामुळे बहुतांश प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे खरे. एकमेकांना क्रेडीट देत प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिल्याने एका वृत्तसंस्थेने या वृत्ताची शहानिशा करता हे वृत्त खोटे असल्याचे पुढे आले. मात्र, हे वृत्त वाचल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. काय आहे ते वृत्त? वाचा सविस्तर...

घटनास्थळ - अर्थातच अमेरिकेतील एक जगप्रसिद्ध शहर न्यूयॉर्क.

घटना- घटस्फोटाची.

प्रकरण - नवऱ्याचे वर्तन आणि बायकोचा विश्वासघात.

..तर मंडळी अमेरिकेतील एका न्यायालयात एका महिलेने अर्ज केला. या महिलेला तिच्या नवऱ्यापासून घटस्फोटासाठी अर्ज केला होता. घटस्फोट कशासाठी? तर, नवऱ्याने विश्वासघात केला म्हणून. आता नवऱ्याने विश्वासघात काय केला? असे सहाजिकच तुम्ही विचारणार! तर ऐका...(माफ करा.. वाचा!)

घटस्फोटाचे कारण पाहून न्यायालय अवाक

पती बेरी डावसन (वय 84 वर्षे) आणि पत्नी डोरोथी (वय 80) यांनी जवळपास 62 वर्षे संसार केला. संसाराच्या वेलीला अपत्यप्राप्ती होऊन वंशवृद्धीची फळेही लागली. या दाम्पत्याला तब्बल सहा मुले आणि सुना, जावई यांच्यासह एकूण 13 नातवंडेही आहेत. सगळं कसं छान चाललंय. आयुष्यातील वास्तव स्थिती डोरोथी यांनी स्वीकारली आहे. पती डावसन महोदयांचाही उगवला दिवस पत्नी डोरोथी यांच्यासोबत नेहमीप्रमाणे मावळत आहे. दैनंदिन व्यवहार नियमितपणे सुरुच आहे. दरम्यान, पत्नी डोरोथी यांना आता वयाच्या 80 व्या वर्षी पती डावसन यांच्यापासून वेगळं व्हायचं आहे. म्हणजे घटस्फोट घ्यायचा आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे रितसर अर्जही केला आहे. या अर्जात उल्लेखलेले घटस्फोटाचे कारण पाहून चक्क न्यायालयही अवाक झाले. (हेही वाचा, रांजणी: पतीच्या गुप्तांगाला केमिकल लाऊन जीवे मारण्याचा प्रयत्न,पत्नी विरोधात नगर येथे गुन्हा दाखल)

काय आहे घटस्फोटाचे कारण?

पत्नी डोरोथी यांनी केलेल्या दाव्यानुसार पती बेरी डावसन हे गेली 62 वर्षे मुकबधीर आहेत. ते बोलत नाहीत. त्यांनी बोलावे यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. पण, ते बोललेच नाहीत. सर्व प्रयत्न करुन झाल्यावर डोरोथी यांनी स्वत:च बदलायचे ठरवले. त्या स्वत: मुकबधीर व्यक्तिंसोबत संवाद साधण्यासाठी विकसित करण्यात आलेली सांकेतिक भाषा शिकल्या. मुले, सुना, जावई आणि नातवंडांनाही त्यांनी ही भाषा शिकवली. अलिकडे तर, सर्व कुटुंबीय हे डावसन महोदयांसोबत सांकेतिक भाषेतच बोलतात. मात्र, अचानक डावसन यांचे बिंग फुटले. ते मुकबधीर नसून त्यांनी सोंग घेतल्याचे पुढे आले. कुटुंबीयांसह पत्नी डावसन डोरोथी हिच्यासाठी तो मोठा धक्का होता. डावसन यांचे सोंग पाहून त्या चिडल्या. त्यांनी थेट घस्टफोट घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला.

पती डावसन महोदय का वागले असे?

62 वर्षांच्या संसारात अवाक्षरही न बोलणारे डावसन महोदय अखेर बोलले. त्यांनी आपण सोंग घेतल्याची कबूली दिली. पत्नीचे ऐकावे लागू नये म्हणून आपण मुकबधीर असल्याचे सोंग घेतल्याचे त्यांनी मान्य केले. पत्नीला दुखावण्याचा किंवा फसविण्याचा आपला कोणताच हेतू नव्हता. पण, एकदा ऐकले तर पत्नीचे आयुष्यभर ऐकावे लागेल, या भीतीपोटी आपण मौनात राहणे (मुकबधीर असल्याचे भासवत) पसंत केले, असे डावसन महोदयांनी म्हटले आहे. जगभरातील अनेक प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. परंतू, या वृत्ताला वास्तवतेचा आधार नसल्याचे पुढे आले आहे. वृत्ताची सत्यता लेटेस्टली मराठीच्या वाचकांसमोर यावी या हेतूने आम्ही हे वृत्त दिले आहे.