Coronavirus: इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना कोरोना विषाणूची लागण; सेल्फ आयसोलेशनमध्येही करणार काम (Video)
UK PM Boris Johnson (Photo Credits: AFP)

सध्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) बोटावर मोजण्याइतके देश सोडून, संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. अगदी सामान्य नागरिकांपासून ते इंग्लंडच्या राजघराण्यापर्यंत या विषाणूने अनेकांना ग्रासले आहे. काही दिवसांपूर्वी प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बातमी आली होती आता चक्क इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांना या विषाणूची लागण झाल्याचे समजत आहे. जॉनसन यांनी स्वतः सोशल मिडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सध्या ते डाऊनिंग स्ट्रीट येथे सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. मात्र कोरोना व्हायरसच्या लढाईत ते काम करत राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

बोरिस जॉनसन ट्वीट -

बोरिस जॉनसन यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे, ‘गेल्या 24 तासांत माझ्यामध्ये कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. त्यानंतर चाचणी केली असता मला कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले. मी आता  स्वत: ला इतरांपासून वेगळे ठेवत आहे. परंतु या विषाणूविरूद्ध लढत असताना व्हिडिओ-कॉन्फरन्सद्वारे सरकारच्या विविध कामांचे मी नेतृत्व करत राहीन. आपण सर्वांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करुया.’ शेवटी त्यांनी ‘घरी राहा जीव वाचवा’ असा हॅशटॅग वापरला आहे. (हेही वाचा:  प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण; स्कॉटलंड येथे सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणार)

दरम्यान, यापूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. पत्नी सोफीला लागण झाल्यानंतर जस्टीन स्वत: आयसोलेशनमध्ये होते. ऑस्ट्रेलियन गृहराज्यमंत्री पीटर डटन यांचीही कोरोना विषाणू चाचणीही सकारात्मक आली आहे. सोबत ब्रिटनच्या आरोग्यमंत्री आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदार नॅडिन डोरिस यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. दरम्यान, ब्रिटन हा जगातील सर्वाधिक कोरोना बाधित देशांपैकी एक आहे. आतापर्यंत येथे 11 हजाराहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत तसेच 550 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.