आजकालच्या काळात बहुतेक लोक ई-सिगरेटचा (E-Cigarette) वापर करताना दिसतात. मात्र धुम्रपान कोणत्याही प्रकारचे असो ते आरोग्यासाठी हानिकारकच असते. ई-सिगरेटचे देखील आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. ई-सिगरेट बाबत अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. तर, अमेरिकेतील एका 17 वर्षांच्या मुलाच्या तोंडात ई-सिगरेट पीत असताना स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भयानक होता की यामुळे या मुलाचा जबडा पूर्णपणे फाटला असून, त्याचे दातही बाहेर आले आहेत.
‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’मध्ये या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय ऑस्टिन (Austin) ला सिगरेट पिण्याची सवय होती. ही सवय सुटावी म्हणून त्याने मागच्या वर्षीपासून ई-सिगरेट प्यायला सुरुवात केली होती. ई सिगरेट सुरक्षित असते असे त्याचे आणि त्याच्या आईचे मत होते. मात्र एके दिवशी ही सिगरेट पीत असताना अचानक तोंडातच फुटली. यामुळे त्याचा जबडा फुटून त्याचे दात बाहेर आले. त्याच्या आईने ताबडतोब त्याचे तोंड टॉवेलमध्ये बांधून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांनी ऑस्टिन यातून बरा झाला. (हेही वाचा: महाराष्ट्र मध्ये E-Cigarettes वर बंदी; तंबाखू इतकंच ई सिगारेटही आरोग्याला घातक)
याबाबत बोलताना, डॉ. केटी रसेल सांगतात, ‘अशा प्रकारे ई सिगरेट खरेदी करण्यापूर्वी याबाबत संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच हे उपकरण वापरण्यावरही नियंत्रण असायला हवे.’ अनेक लोकांना असे वाटते की, ई-सिगरेटमुळे कोणतेही नुकसान नाही, परंतु नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, ई-सिगरेटमध्ये वापरल्या जाणा-या फ्लेव्हरिंग लिक्विडमुळे हृदयाचे नुकसान होऊ शकते. तसेच टेक्सासमध्ये ई-सिगरेटमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही घटना घडली होती.