
सध्या जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढत आहे, अशात प्रत्येक नागरिकानेच काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. विषाणूच्या संसर्गाच्या बाबतीत अमेरिका (US) सर्वात प्रभावित देश आहे मात्र इथे अजूनही लोक अतिशय निर्धास्तपणे वागत आहेत. महत्वाचे म्हणजे यामध्ये डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी इव्हांका ट्रम्प (Ivanka Trump) आणि जावई जारेड कुशनर (Jared Kushner) यांचा समावेश आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, इव्हांका ट्रम्प आणि जारेड कुशनर यांनी कोव्हिड-19 च्या नियमांचे उल्लंघन केल्याने, या जोडप्याला आपल्या तीन मुलांना वॉशिंग्टन डीसीच्या खासगी शाळेतून काढून टाकावे लागले आहे. गेली तीन वर्षे ही मुले या शाळेत शिकत होती.
शाळेच्या प्रशासनाला इव्हांका ट्रम्प आणि जारेड कुशनर हे कोरोनाच्या खबरदारीकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत चिंता होती, म्हणूनच हा निर्णय घेतला गेला. कोरोना दरम्यान शाळेत जाणाऱ्या मुलांना काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहेच, मात्र त्यासोबत त्यांच्या पालकांनीही खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. याबाबत सविस्तर माहिती पालकांच्या हँडबुकमध्ये नमूद केली आहे. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प आणि कुशनर यांनी वारंवार अनेक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. याबाबत इतर पालकांनी या जोडप्याच्या वर्तनाबाबत तक्रार केली होती.
यासोबत इतर पालकांनी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प प्रशासनातील अनेक कोरोना सकारात्मक प्रकरणांचे उल्लेख केला व त्यामुळे शाळेतील इतर मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. इव्हांका ट्रम्प आणि जारेड कुशनर यांचे वागणे सर्वश्रुत होते व त्यामुळे इतर पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत कोणताही धोका पत्करायचा नव्हता. पालकांच्या तक्रारींनंतर शाळेने याबाबत ट्रम्प आणि कुशनर यांच्याशी चर्चा केली. आता या जोडप्याने आपल्या तीनही मुलांना शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: अमेरिकेत डोनाल्ड ट्रंम्प यांना समर्थन, निवडणूकीच्या निकालाविरोधात हजारोंच्या संख्येने नागरिकांचे आंदोलन)
दरम्यान, 26 सप्टेंबर रोजी व्हाइट हाऊस रोज गुलाब गार्डनमध्ये, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात अॅमी कोनी बॅरेटचे नामांकन साजरे करण्यासाठी मोठा समारंभ आयोजित केला होता. त्यानंतरच पालकांनी त्यांच्या चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली.