अमेरीकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप भारतीय-अमेरिकन प्रोफेसर सुरेश व्ही गॅरीमेला यांना देशातील एक प्रतिष्ठित पद देण्याचा विचार करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी सुरेश यांना नॅशनल सायन्स बोर्डाच्या सदस्यांच्या टीममध्य सामील करून घेण्याची मनीषा व्यक्त केली आहे.
गॅरीमेला हे इंडियानाच्या पर्ड्यू विद्यापीठात मॅकेनिकल अभियांत्रिकी विद्यालयातील एक प्रतिष्ठित प्राध्यापक आहेत. तसेच ते नॅशनल सायन्स फाउंडेशन (एनएसएफ) चे उद्योग/विद्यापीठ सहकारी संशोधन केंद्र 'कूलिंग टेक्नोलॉजी रिसर्च सेंटर' चे संचालकदेखील आहेत.
व्हाईट हाउसनुसार गॅरीमेला यांना सहा वर्षांसाठी नॅशनल सायन्स फाउंडेशनचे सदस्यत्वपदी नियुक्त केल जाऊ शकेल. त्यांचा संभाव्य कार्यकाल 10 मे 2024 पर्यंत असू शकतो. गॅरीमेला हे ट्रंपद्वारे नियुक्त केल्या गेलेल्या बोर्डवरील सात सदस्यांपैकी एक असणार आहेत. नॅशनल सायन्स बोर्डाची स्थापना 1950 च्या नॅशनल सायन्स फाऊंडेशन अॅक्टच्या अंतर्गत करण्यात आली होती. हे बोर्ड एनएसएफच्या प्रोग्रॅमचे परीक्षण करते आणि त्यासाठी धोरणे तयार करते.