जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या फूड चेन पैकी एक म्हणजे डॉमिनोज (Domino's). आपला पिझ्झा आणि कोका कोला यांच्या जोरावर अतिशय कमी वेळात डॉमिनोजने मैलाचा दगड गाठला. आजही डॉमिनोज पिझ्झासोबत कोक हे समीकरण ग्राहकांच्या डोक्यात इतके फिट्ट बसले आहे की, या दोन गोष्टींशिवाय इतर कोणत्याही पदार्थाची गरज भासत नाही. मात्र ही पिझ्झा बनवणारी कंपनी डॉमिनोज आणि सॉफ्टड्रिंक बनवणारी कंपनी कोका कोला या दोघांमधील तब्बल 20 वर्षे जुनी पार्टनरशीप संपुष्टात आली असून, तुम्हाला यापुढे डॉमिनोजच्या कोणत्याही आउटलेटमध्ये कोका कोलाचे कोणतेही उत्पादन मिळणार नाहीत.
डॉमिनोज चालवणाऱ्या जुबलियंट या कंपनीने कोकशी असणारा करार रद्द करून, पेप्सिकोशी नवा करार केला आहे. कंपनीने हा निर्णय खर्च कमी करण्यासाठी घेतला असल्याचे सांगितले जाते. या निर्णयामुळे कोका कोलाला फार मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. कारण डॉमिनोजमुळे बाजारात आपले पाय रोवण्यासाठी कोका कोलाला फारच मदत झाली होती. मात्र आता कोकच्या विक्रीवर या निर्णयाचा फार मोठा परिणाम होणार आहे.
सध्या जगभरातील 85 देशांमध्ये डॉमिनोज आपली सेवा पुरवत आहे. मिशिगन याठिकाणी कंपनीचे हेडक्वार्टर असून, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आणि मलेशिया हे देश सोडून संपूर्ण जगभरात कोकाकोला आणि डॉमिनोजची पार्टनरशिप होती. मात्र आता हे नाते तुटल्याने फक्त मॅकडोनल्डसोबतच कोकचा करार अबाधित आहे. तर पिझ्झा हट, केएफसी, टाको बेल आणि आता डॉमिनोज यांसारख्या ब्रँडशी पेप्सिको जोडले गेले आहे.