Diwali 2021: काय सांगता? पाकिस्तानच्या मंत्र्यांनी दिवाळीला दिल्या होळीच्या शुभेच्छा; ट्रोल झाल्यावर पोस्ट केली डिलीट (See Post)
मुख्यमंत्री मुराद अली शाह (संग्रहित संपादित प्रतिमा)

प्रकाशाचा सण... दीपावली (Diwali 2021), जगभरातील हिंदू आणि इतर धर्माच्या लोकांनी गुरुवारी मोठ्या थाटामाटात साजरा केला. या पर्वाचे औचित्य साधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यापासून ते जगातील अनेक दिग्गज नेत्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यादरम्यान, पाकिस्तानमधूनही (Pakistan) शुभेच्छा आल्या, परंतु त्या दिवाळीच्या नव्हत्या तर त्या होत्या होळीच्या (Holi). होय. पाकिस्तानमध्ये सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेल्या सिंध (Sindh) प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी दिवाळीला होळीच्या शुभेच्छा दिल्या. या चुकीमुळे सध्या जगभरात त्यांना ट्रोल केले जात आहे.

पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह (Murad Ali Shah) यांनी काल दिवाळीऐवजी होळीच्या शुभेच्छा देत सोशल मिडियावर एक पोस्ट लिहिली. त्यानंतर जेव्हा ते याबाबत ट्रोल होऊ लागले, तेव्हा त्यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी पोस्ट डिलीट केली. या पोस्टमध्ये सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली यांचा फोटो दिसत होता आणि त्यावर होळीच्या शुभेच्छा लिहिलेल्या होत्या.

इतक्यात पाकिस्तानमधील ज्येष्ठ पत्रकार मुर्तझा सोलांगी यांनी या पोस्टचा स्क्रीनशॉट ट्विट केला. त्यांनी म्हटले- 'पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात सर्वाधिक हिंदू आहेत. अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे हिंदू बहुसंख्य आहेत. परंतु सिंधच्या सीएम हाऊसच्या कर्मचार्‍यांना दीपावली आणि होळी यातील फरक कळत नाही ही खूप दुःखदायक गोष्ट आहे.’ डिलीट करण्यात आलेल्या पोस्टवर मुर्तझा म्हणाले की, ‘माफी न मागता पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. ही मोठी चूक आहे. चुका एखाद्या व्यक्तीकडून होतात, संस्थेकडून होत नाहीत.' (हेही वाचा: अमेरिकेचे अध्यक्ष Joe Biden यांनी थाटामाटात साजरी केली दिवाळी; पहिल्यांदाच दिवाळीच्या थीमवर सजले One World Trade Center (Watch Video)

दरम्यान, पाकिस्तानमधील सिंध प्रांतात सर्वाधिक हिंदू लोकसंख्या आहे. सन 2017 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार, सिंध प्रांतात 41 लाख 80 हिंदू राहतात, जे तेथील एकूण लोकसंख्येच्या 8.73 टक्के आहे. सिंध प्रांतातच, रामपीर मंदिर, उमरकोट शिव मंदिर यासारखी इतर अनेक प्रसिद्ध हिंदू मंदिरे आहेत.