Mahatma Gandhi Statue Desecration: महात्मा गांधींच्या पुतळ्याची Washington मध्ये विटंबना; अमेरिकेचे राजदूत Ken Juster यांनी भारतीयांची मागितली जाहीर माफी
Mahatma Gandhi Statue Outside US Embassy (Photo Credits: ANI)

अमेरिकेत (US) सध्या गोंधळाचे वातावरण आहे. सर्वत्र दंगेखोर आणि निदर्शक उपद्रव करीत आहेत, जाळपोळ, लूटमार अशा घटना घडत आहेत. अमेरिकेतील एका कृष्णवर्णीय व्यक्तीची हत्या झाल्याने आता देशात सर्वत्र हिंसेचे वातावरण आहे. अशात काही लोकांनी महात्मा गांधींचा पुतळा (Mahatma Gandhi Statue) फोडून त्याची विटंबना केली. यामुळे सर्व भारतीयांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. भारतीयांचा रोष लक्षात घेता आता डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने याबाबत माफी मागितली आहे. या संपूर्ण घटनेबद्दल अमेरिकेचे राजदूत केन जस्टर (Ken Juster, U.S. Ambassador) यांनी शोक व्यक्त केला असून भारतीयांची जाहीर माफी मागितली आहे.

वॉशिंग्टन डीसीमध्ये 2 जून आणि 3 जून रोजी ही घटना घडली. भारतीय दूतावासाने राज्य विभागाला याबाबत कळविले आणि या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या स्थानिक कायदा अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींकडे तक्रार दाखल केली. मेट्रोपॉलिटन पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी घटनास्थळी भेट दिली व आता त्यांचा तपास सुरु आहे. तसेच हा पुतळा लवकरात लवकर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वॉशिंग्टनमध्ये असणाऱ्या परराष्ट्र नेत्यांच्या मोजक्या पुतळ्यांपैकी एक हा महात्मा गांधी यांचा पुतळा आहे.

एएनआय ट्वीट -

या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांनी 16 सप्टेंबर 2000 रोजी, आपल्या अमेरिकेच्या दौर्‍यावेळी तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या उपस्थितीत केले होते. ऑक्टोबर 1998 मध्ये अमेरिकेच्या संसदेने भारत सरकारला कोलंबिया जिल्ह्यातील फेडरलच्या जागेवर महात्मा गांधी यांच्या सन्मानार्थ स्मारक उभारण्याचा अधिकार दिला होता. दरम्यान, दंगेखोरांनी हा पुतळा तोडल्यानंतर, पोलिसांनी त्यास कव्हर केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकेत भारतीय दूतावासाकडून सध्या तरी कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.