Donald Trump | (Photo Credits: AFP)

2019 मध्ये कोरोना विषाणूचा (Coronavirus) पहिला रुग्ण आढळला होता. चीनच्या (China) वूहान (Wuhan) शहरातून या महामारीला सुरुवात झाली होती व अवघ्या काही आठवड्यांमध्ये हा विषाणू जगात सर्वत्र पसरला. गेले अनेक महिने अमेरिकचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Former US President Donald Trump) सांगत आहेत, हा विषाणू चीनने आपल्या प्रयोगशाळेत निर्माण केला आहे. याबाबत डब्ल्यूएचओच्या टीमने चीनचा दौराही केला होता, मात्र त्यावेळी असा कोणताही पुरावा हाती लागला नव्हता. आता पुन्हा जगभरात चीननेच हा विषाणू निर्माण केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी एक निवेदन जारी करत चीनने घडवून आणलेले मृत्यू आणि विनाशासाठी अमेरिका व जगाला 10 ट्रिलियन डॉलर्स द्यावेत अशी मागणी केली आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच कोरोना विषाणू महामारीसाठी चीनला दोषी ठरवत आले आहेत. त्यांनी अनेकदा जाहीर सभांमध्ये कोरोना विषाणूला ‘चिनी व्हायरस’ असे संबोधले आहे. आता नवे राष्ट्राध्यक्ष जो बिडेनदेखील याबाबत चौकशी करत आहेत. यावर ट्रम्प म्हणाले, 'प्रत्येकजण, अगदी शत्रू म्हणवणारे देखील असे सांगत आहे की, वुहानच्या प्रयोगशाळेतून चिनी व्हायरस आला असल्याचे डोनाल्ड ट्रंप यांचे मत बरोबर होते. या साथीमुळे झालेले मृत्यू आणि नुकसानीची भरपाई करण्यासाठी चीनने अमेरिका आणि जगाला 10 ट्रिलियन रुपये द्यावेत.’

सध्या जगातील बहुतेक तज्ञ कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी चीनवर शंका घेत आहेत. इतकेच नव्हे तर आता बिडेन प्रशासन आणि ब्रिटनसह भारतानेही कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत नव्याने चौकशी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेवर दबाव आणण्याची मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात अध्यक्ष जो बिडेन यांनी सांगितले की, कोविड-19 च्या उत्पत्तीबद्दल त्यांनी नव्याने चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीचा आदेश 90 दिवसांत सादर होईल. (हेही वाचा: China: वुहान लॅबमध्ये तयार झाला Covid-19; अभ्यासामध्ये मोठा खुलासा, शास्त्रज्ञांना कोविड-19 नमुन्यांवर मिळाले 'खास फिंगरप्रिंट्स')

दरम्यान, ब्रिटीश प्रोफेसर अँगस डॅलगिश (Angus Dalgleish) आणि नॉर्वेजियन वैज्ञानिक डॉ. बिर्गर सरेन्सेन (Dr. Birger Sørensen) यांनी नुकतेच एक अभ्यास प्रकाशित केला आहे. यामध्ये त्यांनी  चीनमधील शास्त्रज्ञांनीच 'वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी' येथे कोविड-19 व्हायरस तयार केला असा दावा केला आहे.