
तिबेटी धर्मगुरू दलाई लामा (Dalai Lama) यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांच्या पुढील पुनर्जन्माची (Dalai Lama Successor) ओळख करण्याचा संपूर्ण अधिकार फक्त गदेन फोड्रंग ट्रस्टकडे आहे. ही संस्था त्यांनी स्वतः स्थापन केली असून, कोणत्याही बाह्य घटकाला – विशेषतः चीनला – या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. बुधवारी जारी केलेल्या निवेदनात दलाई लामा म्हणाले, “24 सप्टेंबर 2011 रोजी केलेल्या निवेदनात पुढील दलाई लामाची ओळख (Tibet Spiritual Leadership) कशी पटवायची याची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. या प्रक्रियेसाठी जबाबदारी ही केवळ गदेन फोड्रंग ट्रस्ट व दलाई लामांच्या कार्यालयाकडे असेल.” त्यांनी यासोबत असेही नमूद केले की, ट्रस्टने विविध तिबेटी बौद्ध परंपरांच्या प्रमुख आणि दलाई लामांच्या परंपरेशी अटूट संबंध असलेल्या शपथबद्ध धर्मरक्षकांशी सल्लामसलत करून पारंपरिक पद्धतीने शोध व ओळख करण्याची प्रक्रिया राबवावी.
तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी स्पष्टपणे म्हटले की, मी पुन्हा सांगतो की, गदेन फोड्रंग ट्रस्टलाच पुढील पुनर्जन्म मान्य करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. या विषयात इतर कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दलाई लामांनी सांगितले की 24 सप्टेंबर 2011 रोजी तिबेटी आध्यात्मिक परंपरांच्या प्रमुखांच्या बैठकीत त्यांनी दलाई लामांच्या संस्थेच्या भविष्यावर भाष्य केले होते. त्या वेळी मी तिबेटी जनता, तिबेटी बौद्ध धर्माचे अनुयायी आणि तिबेटशी संबंध असणाऱ्या लोकांना उद्देशून सांगितले होते की दलाई लामांचा पुनर्जन्म भविष्यात व्हावा की नाही, हे संबंधीत लोकांनी ठरवावे. मी 1969 मध्येही हेच मत मांडले होते, असे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, गेल्या 14 वर्षांत त्यांनी या विषयावर सार्वजनिकपणे काहीही बोललेले नव्हते. मात्र, या कालावधीत तिबेटी आध्यात्मिक परंपरांच्या प्रमुख, निर्वासित तिबेटी संसद सदस्य, विशेष महासभेचे प्रतिनिधी, केंद्रीय तिबेटी प्रशासन, विविध NGO, हिमालयीन प्रदेशातील बौद्ध, मंगोलिया, रशियन फेडरेशनमधील बौद्ध राज्ये आणि मुख्य भूमी चीनसह संपूर्ण आशियामधील बौद्ध अनुयायांकडून अनेक विनंत्या प्राप्त झाल्या.
याचबरोबर, तिबेटमधील लोकांनी विविध माध्यमातून हीच मागणी केली आहे. या सर्व विनंत्यांच्या पार्श्वभूमीवर मी दलाई लामांच्या संस्थेचा पुढेही कायम राहण्याचा निर्णय पुन्हा एकदा जाहीर करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. दलाई लामांच्या या स्पष्ट भूमिकेनंतर आता गदेन फोड्रंग ट्रस्टकडून त्यांच्या उत्तराधिकारीच्या निवडीसाठीची प्रक्रिया औपचारिकरित्या सुरू होण्याची शक्यता आहे.