2019 मध्ये चीनच्या (China) वूहान (Wuhan) शहरात सर्वात प्रथम कोरोना विषाणू (Coronavirus) आढळला होता. त्यानंतर 2020 मध्ये तो जगभरात पसरला. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी हा विषाणू वूहानच्या प्रयोगशाळेत लीक झाला असल्याचा आरोप केले होता. मात्र प्रत्येकवेळी चीनने यास नकार दिला आहे. आता आज बुधवारी, वुहान व्हायरलॉजी इन्स्टिट्यूटमधून (WIV) कोविड-19 लीक केल्याच्या आरोपांबाबत स्वतंत्र चौकशीस परवानगी देणार का, या प्रश्नावर चीनने चुप्पी साधली असून हा प्रश्न टाळला आहे. यामुळे पुन्हा एकदा चीनची भूमिका संशयास्पद आढळली असून चर्चेला उधाण आले आहे.
त्याच वेळी, चिनी संशोधकांनी असा दावा केला आहे की हे संक्रमण पेंगोलिन (सरड्याचा एक प्रकार) पासून मानवांमध्ये गेले आहे. मात्र याआधी अमेरिकेच्या एका रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला आहे की, 30 डिसेंबर 2019 रोजी चीनने कोविड-19 ची अधिकृत घोषणा करण्यापूर्वी काही डब्ल्यूआयव्ही संशोधक आजारी पडले होते. त्यानंतर आता कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबद्दल स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी तीव्र झाली आहे.
चौकशीच्या मागणीवरील प्रश्नांना उत्तर देताना चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) तज्ज्ञ गटाने केलेल्या अभ्यासाचा हवाला दिला. मात्र त्यांनी या विषाणूच्या व्युत्पत्तीच्या चौकशीसाठी बीजिंग सहमत होईल की नाही, हा प्रश्न टाळला. डब्ल्यूएचओ तज्ज्ञ गटाने 14 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान वुहान आणि डब्ल्यूआयव्हीला भेट दिली होती.
मंगळवारी वॉशिंग्टनच्या माध्यमांच्या वृत्तानुसार व्हाईट हाऊसचे कोरोना व्हायरसचे सल्लागार अॅन्डी स्लाव्हिट यांनी उद्धृत केले आहे की, आम्हाला कोरोना विषाणूच्या उत्पत्तीच्या तळापर्यंत जाण्याची गरज आहे. तसेच डब्ल्यूएचओ आणि चीनला जागतिक समुदायाला अधिक निश्चित आणि ठोस उत्तरे देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. ‘‘आम्हाला चीनकडून पूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया हवी आहेत आणि डब्ल्यूएचओ कडून पूर्ण सहकार्य आवश्यक आहे, जे आता मिळत नाही.’ असे स्लावट यांनी कोरोना व्हायरस टास्क फोर्स ब्रिफिंगला सांगितले. (हेही वाचा: Mask Rules In South Korea: लसीकरण झालेल्यांना मास्क वापरण्याची गरज नाही; US नंतर दक्षिण कोरिया सरकारकडून नागरिकांना सशर्थ सवलत)
दरम्यान, वॉल स्ट्रीट जर्नलने 24 मे रोजी सांगितले की, एप्रिल 2012 मध्ये, 6 खाण कामगार एका खाणीला भेट दिल्यानंतर कोरोना व्हायरससारख्या एका रहस्यमय आजाराने आजारी पडले होते. डब्ल्यूआयव्हीच्या मोठ्या संशोधकांनी याची तपासणी केली होती. डब्ल्यूआयव्हीच्या संशोधकांचा असा दावा आहे की हा विषाणू पॅंगोलिनच्या अगदी जवळचा आहे आणि वुहान लॅबमधून लीक झाल्याची शक्यता नाही.