Coronavirus Vaccination: अमेरिकेत डिसेंबरपासून सुरु होऊ शकते कोरोना विषाणू लसीकरण
Vaccine | Image for representational purpose (Photo Credits: Pixabay)

सध्या जगभरात कोरोना विषाणू (Coronavirus) बाबतील अमेरिका (US) सर्वात प्रभावित देश आहे. एकीकडे या संकटाचा सामना करीत असताना अमेरिकन जनतेसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरस बाबतचे लसीकरण (Vaccination) डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीपासून सुरू होणे अपेक्षित आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एजन्सी फ्रान्स-प्रेसे या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. ऑपरेशन वॅप स्पीडचे मुख्य सल्लागार मोन्सेफ स्लोई (Moncef Slaoui) म्हणाले, अमेरिका कोविड लसीकरणाचा एक व्यापक कार्यक्रम डिसेंबरच्या सुरूवातीस सुरू करू शकते.

ते म्हणाले, 'मंजूरी मिळाल्यानंतर 24 तासांच्या आत लस लसीकरण साइटवर पाठवणे ही आमची योजना आहे. मी अपेक्षा करतो की मंजुरीच्या दुसर्‍या दिवशी, म्हणजेच 11 किंवा 12 डिसेंबर रोजी लसीकरण होईल.'  मॉन्सेफ स्लोई पुढे म्हणाले, 'रोग नियंत्रण केंद्राच्या लसीकरण कार्यक्रमाच्या अनुसार, कोरोना व्हायरस विरूद्ध लसीकरण करण्यासाठी अमेरिकेच्या पहिल्या गटात संघराज्यीय कामगार आणि आरोग्यसेवा कर्मचारी असतील.’ (हेही वाचा: Pfizer COVID-19 Vaccine: फायझरची कोरोना व्हायरस लस 95 टक्के प्रभावी; आपत्कालीन मंजुरीसाठी तयार)

अमेरिकेची दिग्गज बायोटेक कंपनी फायझर (Pfizer) आणि त्याची जर्मन भागीदार बायोटेक यांनी शुक्रवारी त्यांची कोरोना विषाणूची लस लवकरच आणण्यासाठी अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. फायजरची mRNA आधारित BNT162b2 लस क्लिनिकल चाचणीच्या अंतिम टप्प्यात 95% प्रभावी ठरली आहे. यासह, सीएनबीसीच्या अहवालानुसार पाच फेडरल एजन्सींनी कर्मचार्‍यांना फायजर किंवा मॉडर्नाची कोरोना व्हायरस लस कमीतकमी आठ आठवड्यांत मिळू शकेल असे सांगण्यास सुरूवात केली आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.