Coronavirus: पाकिस्तानचा संतापजनक प्रकार, लॉकडाउनच्या काळात हिंदू, ख्रिस्ती नागरिकांना राशन देणे नाकारले
पाकिस्तानात ख्रिस्ती नागरिकांना राशन नाकारले (Photo Credits-ANI)

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसचे सर्वाधिक जाळे इटलीत पसरल्याने तेथे सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे. तसेच पाकिस्तानात (Pakistan) सुद्धा कोरोना व्हायरसची नागरिकांना लागण झाली आहे. पण पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांनी देशातील 25 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक दारिद्ररेषेखाली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाउन लागू करणे शक्य नसल्याचे इमरान खान यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभुमीवर सरकारकडून लॉकडाउनच्या परिस्थिती नागरिकांना राशन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र नंतर त्यांनी जातीवरुन भेदभाव करत हिंदू आणि ख्रिस्ती धर्मियांना राशन देण्याचे नाकारले आहे. यामुळे त्यांच्या विरोधात स्थानिक हिंदू आणि ख्रिस्ती धर्मियांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सरकारकडून लॉकडाउनच्या काळात सर्व नागरिकांना राशन दिले जाणार असे सांगण्यात आले. मात्र नंतर त्यांनी ख्रिस्ती बांधवांना राशन देण्यार नाकारले असल्याची माहिती समोर आली आहे. एका महिलेने आम्ही सुद्धा पाकिस्तानी असून कराची येथे राहत असल्याचे म्हटले आहे. परंतु जातीच्या नावाखाली केला जाणारा भेदभाव योग्य नसल्याचे स्थानिक ख्रिस्ती लोकांनी म्हटले आहे. तसेच आम्ही अल्पजातीचे असल्याचे ही अधिकाऱ्यांनी म्हणत राशन दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर  पाकिस्तान येथील कोरोनाबाधितांचा आकडा 900 च्या पार गेला आहे.(धक्कादायक! कोरोना व्हायरस कर्फ्यूमध्ये बाल्कनीमध्ये खेळत होता 13 वर्षांचा मुलगा; पोलिसांनी गोळ्या घालून केली हत्या)

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियात इमरान खान यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त व्हायरल झाले होते. हे वृत्त व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. या व्हायरल पोस्टवर पाकिस्तानी सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले. त्यावर त्यांनी व्हायरस झालेले वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले होते.