Coronavirus in China: ब्राझीलमधून आयात केलेल्या Frozen Chicken Wings मध्ये आढळला कोरोना विषाणू; चीनचा दावा
Group of chicken (Photo Credits: Pixabay)

जगामध्ये चीन (China) पासून कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गाला सुरु झाली. गेल्या पाच महिन्यांपासून संपूर्ण जग या विषाणूशी लढा देत आहे, तर दुसरीकडे चीनने आपल्या देशामध्ये हा संसर्ग आटोक्यात आणल्याचा दावा केला आहे. मात्र आता ब्राझील (Brazil) मधून आयात केलेल्या फ्रोजन चिकन विंग्ज (Frozen Chicken Wings) मध्ये कोरोना विषाणू आढळल्याचा दावा चीनने केला आहे. वास्तविक, चीनच्या शेंझेन (Shenzhen) च्या स्थानिक रोग नियंत्रणाने ब्राझीलमधून पाठविलेल्या फ्रोजन चिकनचा नमुना घेतला. नेहमीच्या तपासणीनंतर, नमुना अहवाल आल्यानंतर गोठलेल्या चिकनच्या पंखांमध्ये कोरोना विषाणू असल्याचे दिसून आले. यापूर्वी इक्वाडोरमधून आयात केलेल्या कोळंबीमध्येही कोरोना विषाणू आढळला होता.

गुरुवारी (13 ऑगस्ट) चीनी अधिकाऱ्यांनी संक्रमित कोंबडीच्या संपर्कात आलेले काही लोक आणि इतर उत्पादनांचीही तपासणी केली. मात्र त्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. चीनचे शहर शेन्झेन सीडीसीने इतर देशातील खाद्यपदार्थ खाण्याबाबत सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. कोरोना विषाणूमुळे जूनमध्ये ब्राझीलसह अनेक देशांकडून मांस आयात करण्यावर चीनने बंदी घातली होती. मात्र, लवकरच हा निर्णय मागे घेण्यात आला. त्याच वेळी, हे सकारात्मक नमुने मांसाच्या पृष्ठभागावरून घेतल्याची नोंद आहे, तर इतर चिनी शहरांमध्ये, आयातित गोठविलेल्या सीफूडच्या पॅकेजिंग पृष्ठभागावरून घेतलेले नमुने सकारात्मक आल्याचे आढळले आहे. (हेही वाचा: तब्बल 102 दिवसांनतर न्यूझीलंडमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांची नोंद; Auckland शहरात लॉकडाऊन जाहीर)

चीन सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ब्राझीलमधून चिकनसह पाठविलेल्या इतर खाद्य पदार्थांचे नमुने नकारात्मक असल्याचे आढळले आहे. या पॅकेटच्या नोंदणी क्रमांकावरून असे दिसून आले की, चिकन दक्षिण ब्राझीलच्या सांता कॅटरिना राज्यातील अरोरा एलिमेन्टोस प्लांटमधून आले आहे. मात्र, अद्याप ब्राझीलकडून कोणतेही निवेदन देण्यात आले नाही. दरम्यान,  2019 च्या उत्तरार्धात चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला. त्यावेळी प्राथमिक तपासामध्ये या व्हायरसचे स्त्रोत वुहान शहरातील मांस बाजार असल्याचे निदर्शनास आले होते. या मांस बाजारात वन्यजीवांचे मांस विकले जात आहे.