कोरोना व्हायरसची लागण झाल्याने 800 हून अधिक जणांचा मृत्यू, WHO चीनमध्ये पाठवणार विशेष पथक
Coronavirus Outbreak in China (Photo Credits: IANS)

जागतिक पातळीवर कोरोनो व्हायरसमुळे (Coronavirus) मोठे नुकसान झाले आहे. चीनमध्ये आतापर्यंत या विषाणूची लागण झाल्याने 800 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 780 जण हे हुबेई प्रांतातील रहिवाशी आहेत. तसेच जगभरातील जवळपास 37 हजार लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चीनमध्ये आपले विशेष पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरचा धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने हे पाऊल उचलले आहे. हे पथक मंगळवारपर्यंत चीनमध्ये दाखल होणार आहे. सुरुवातीला या पथकाचे प्रमुख चीनमध्ये दाखल होणार असून त्यानंतर या पथकातील इतर सदस्य याठिकाणी पोहचणार आहेत, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टीड्रोस अधानम घेब्रेयेसस यांनी दिली आहे. तसेच टीड्रोस यांनी या पथकात अमेरिकेचे सदस्यही भाग घेतील, अशी आशा व्यक्त केली आहे. (हेही वाचा - जपानमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या क्रूजवर 138 भारतीय अडकले)

भारतात केरळ राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेले 3 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चीनमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. जपानच्या योकोहामा बेटावर उभ्या असलेल्या क्रूज जहाज 'डायमंड प्रिंसेस'मध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. या क्रूजवर 130 हून अधिक भारतीय अडकले आहे. या नागरिकांना भारतात परतण्यासाठी 10 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. या भारतीयांना लवकरात-लवकर स्व: गृही परतण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.