कोरोना विषाणूच्या (Coronavirus) काळात जगभरातील अनेकांना मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागला आहे. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कामधंदे बंद झाले. कोरोनामुळे मनोरंजन पार्क पूर्णपणे प्रभावित झाले आहेत. आता कोरोना व्हायरसच्या संकटामुळे वॉल्ट डिस्ने वर्ल्ड (Walt Disney World) आपल्या 11,000 कर्मचार्यांना कामावरुन काढून टाकणार आहे. यानंतर, कंपनीच्या फ्लोरिडाच्या रिसॉर्टमध्ये साथीच्या आजारामुळे कामावरून काढून टाकलेल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 18,000 होईल. डिस्ने वर्ल्डच्या 11,350 कर्मचार्यांनी एक संघटना स्थापन केली आहे. यात बहुधा अर्धवेळ कर्मचारी आहेत.
या कर्मचार्यांच्या स्थानिक व राज्यस्तरीय नेत्यांना लिहिलेल्या पत्रात कंपनीने म्हटले आहे की, या वर्षाच्या अखेरीस या कर्मचार्यांना कामावरुन काढून टाकले जाईल. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी म्हटले होते की, फ्लोरिडामधील युनियन कर्मचार्यांपैकी 6,400 कर्मचार्यांनाही कामातून काढून टाकले जाईल. या वर्षाच्या सुरूवातीस, डिस्ने वर्ल्डमध्ये काम केलेल्या 720 कलाकार आणि गायकांना काढून टाकण्यात आले होते. या कलाकारांचे प्रतिनिधित्व करणारी कामगार संस्था अॅक्टर्स इक्विटी असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, नोकरीवरून काढून टाकण्याचे कारण म्हणजे कंपनीच्या फ्लोरिडा रिसॉर्टमधील अनेक लाईव्ह करमणूक कार्यक्रम रद्द होणे हे आहे. (हेही वाचा: फ्रांसमध्ये दुसऱ्या लॉक डाऊनच्या घोषणेनंतर राजधानी पॅरिसमध्ये तब्बल 700 किमीचे ट्राफिक जाम)
वॉल्ट डिस्नेने गेल्या महिन्यात फ्लोरिडा आणि कॅलिफोर्नियामधील त्याच्या पार्क युनिटमधील 28,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना साथीच्या प्रारंभाच्या वेळी कंपनीचे पार्क बंद पडली होती. काही काळापूर्वी फ्लोरिडा येथील पार्क उघडण्यात आले. मात्र, ते उघडल्यानंतरही त्यावर काही अटी घालण्यात आल्या आहेत, जसे की एकावेळी किती लोक पार्कमध्ये प्रवेश करू शकतात. तसेच सामाजिक अंतर व मास्कचा वापर. कॅलिफोर्निया पार्क अजूनही बंद आहे.