Death | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

चीन (China) मध्ये कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरशः थैमान घातले असताना आता रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरांनाच संसर्गाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. ली झिमिंग (Lee Ximing) असे या मृत डॉक्टरांचे नाव आहे, याशिवाय, चीन मधील आरोग्य विभागात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना सुद्धा या व्हायरसची लागण झाल्याचे समजत आहे. ली झिमिंग हे वुचांग रुग्णालयात (Wuchang Hospital) कार्यरत होते , वुहान (Wuhan) मध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण या वुचांग रुग्णालयात दाखल आहेत. याच रुग्णांवर उपचार करत असताना वरिष्ठ डॉक्टर ली झिमिंग यांना कोरोनाची लागण झाली होती. मृत्यू झालेले डॉक्टर हे रुग्णालयाचे संचालक होते. जपान सरकारने कोरोना व्हायरस मुळे संक्रमित होऊन जहाजावर अडकलेल्या लोकांना केले 2 हजार आयफोनचे वाटप

प्राप्त माहितीनुसार, मागील आठवड्यात ली झिमिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू होते. मात्र आता त्यांचा अखेरीस मृत्यू झाला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी, कोरोना व्हायरसची सर्वात पहिल्यांदा माहिती देणाऱ्या डॉक्टरचा सुद्धा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता तर, डॉक्टर सॉन्ग यिंगजी या तरुण डॉक्टरांचा सातत्याने 10 दिवसांपासून आराम न करता कोरोना व्हायरस संक्रामित रुग्णांवर उपचार केळ्याने मृत्यू झाला होता. यांनंतरही अनेक वैद्यकीय कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार करत आहेत.

दरम्यान, चीनमधील हुबेई प्रांतात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. हुबेई प्रांतातील वुहान शहरातून या व्हायरसची लागण सुरू झाली. कोरोनामुळे आतापर्यंत 1868 जणांचा बळी गेला असून 72 हजार 436 जणांना लागण झाली असल्याचे समोर आले आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने याबाबत माहिती जारी केली आहे. करोनाचे 1097 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, 11 हजार 741 रुग्णांची प्रकृती नाजूक आहे.