Coronavirus मुळे अमेरिकेत हाहाकार; 1.75 लाख संक्रमित रुग्णांची नोंद, 3,415 लोकांचा मृत्यू, चीन व इटलीलाही टाकले मागे
Coronavirus in US (Photo Credits: Getty Images)

चीनच्या (China) वुहानपासून पसरलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) मुळे सध्या संपूर्ण जगात विनाश ओढवला आहे. त्यातही अमेरिकेत तर हाहाकार माजला आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या दीड लाखाच्या वर गेली आहे आणि तीन हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. सोमवारी अमेरिकेत कोरोनामुळे कमीतकमी 540 लोक मरण पावले, त्यानंतर ही संख्या 3017 वर गेली. अशाप्रकारे संपूर्ण जगात कोरोना बाधित रुग्णांमध्ये सध्या अमेरिका अव्वल आहे. त्यानंतर इटलीमध्ये 1.01 लाख आणि चीनमध्ये 81 हजार संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे.

व्हायरसच्या वाढत्या घटनांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, या पार्श्वभूमीवर दहा लाखाहून अधिक अमेरिकन लोकांची कोरोनासाठी चाचणी घेण्यात आली. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या फक्त तीन टक्के आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर हे या साथीच्या आजाराचे महत्वाचे केंद्र बनले आहे. न्यूयॉर्कमध्ये 1,200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये मृत्यूची संख्या अजून वाढू शकते असे ट्रम्प म्हणाले आहेत. या कारणास्तव, सरकारने जारी केलेल्या 'सोशल डिस्टसिंग’ मार्गदर्शक तत्वे 30 एप्रिलपर्यंत चालू राहतील. (हेही वाचा: Coronavirus: 'शक्य असेल तर कृपया आम्हाला मदत करा'; न्यूयॉर्कचे गव्हर्नर Andrew Cuomo यांची वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भावनिक साद)

अशात न्यूयॉर्कमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी नेव्हीचे 1000 बेडचे जहाजही शहरात पोहचले आहे. या जहाजात 1000 बेड, 1200 वैद्यकीय कर्मचारी, 12 ऑपरेशन थिएटर, लॅब, फार्मसी अशा सुविधा आहेत. दरम्यान, या साथीच्या आजाराने युरोपियन देशांमध्ये संक्रमित झालेल्या 399,381 प्रकरणांपैकी 25,037 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. चीन, अमेरिकानंतर इटली आणि स्पेन या देशांत या विषाणूचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. इटलीमध्ये कोरोना संक्रमणाची एकूण संख्या जवळपास एक लाखांवर पोहोचली आहे. तर स्पेनमध्ये सोमवारी 537 पेक्षा जास्त लोक मरण पावले. इंग्लंड येथे 1,789 लोकांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.