Andrew Cuomo (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेल्या एक आठवड्यापासून अमेरिकेत (America) हजारो कोरोना व्हायरसची (Coronavirus) प्रकरणे उघडकीस आली आहेत. 20 जानेवारी रोजी कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला होता आणि आतापर्यंत इथल्या लाखो लोकांना या धोकादायक विषाणूची लागण झाली आहे. न्यूयॉर्क (New York) शहर दुसरे वुहान होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत न्यूयॉर्कमध्ये कोरोना विषाणूची 67,325 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 1300 हून अधिक मृत्यू झाले आहेत. अशात न्यूयॉर्क येथे मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू लागला आहे. शहरातील भीषण परिस्थिती पाहून न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू क्योमो (Andrew Cuomo) यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदतीसाठी भावनिक साद घातली आहे.

क्योमो यांनी लोकांना आमच्याकडे वैद्यकीय स्वयंसेवक व्हावे असे आवाहन केले आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असूनही अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉकडाऊन जाहीर केले नाही. यामुळे या प्रकरणांमध्ये अजूनच भर पडत आहेत. अशात अँड्र्यू क्योमो मदतीसाठी याचना करीत आहेत. त्यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. यामध्ये ते लिहितात, ‘मी देशभरातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदतीसाठी आवाहन करीत आहे. तुमच्या इथे गरज नसल्यास कृपया न्यूयॉर्कला या. आम्हाला परिचारिका आणि डॉक्टर्स यांची गरज आहे. आम्हाला मदत करा वेळेनुसार आम्ही त्याची परतफेड करू’.

9 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यानंतर लोकांच्या मदतीसाठी नौदलाची जहाजे प्रथमच अमेरिकेत आली आहेत. न्यूयॉर्कच्या रूग्णालयांचा ताण कमी करण्यासाठी नौदलाचे एक जहाज 1000 बेड्ससह किनाऱ्यावर आले आहे. याबाबत गव्हर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व रुग्णालयांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण आहेत आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा संयम सुटू लागला आहे. त्यामुळे शहरात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीची गरज आहे. (हेही वाचा: कोरोनाबाधीत रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या 17 जणांना COVID-19 ची लागण)

दरम्यान, अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये कोरोना विषाणूची 16636 प्रकरणे नोंदवली गेली आहे आणि 198 लोक मरण पावले आहेत. कॅलिफोर्नियामध्ये सुमारे 7426 प्रकरणे आणि 149 लोकांचा मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टन मधून अमेरिकेत कोरोना विषाणूच्या पहिल्या मृत्यूची घटना समोर आली  होती. सध्या तेथे संक्रमित लोकांची संख्या 5250 आहे आणि 210 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.