कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे जगातील 1.6 अब्ज लोक म्हणजेच, जगभरातील जवळपास अर्धे कामगार बेरोजगार होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (International Labour Organisation) ही भीती व्यक्त केली आहे. आयएलओच्या मते, एप्रिल ते जून या तीन महिन्यांत सुमारे 30.5 कोटी लोकांची त्यांची पूर्ण-वेळेची नोकरी जाऊ शकते. तसेच कोरोना व्हायरसमुळे किरकोळ व उत्पादन क्षेत्रासह 43 कोटीहून अधिक उद्योग मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत. जगभरात सुमारे 3..3 अब्ज कामगार आहेत, असंघटित अर्थव्यवस्थेत जवळपास दोन अब्ज कामगार आहेत आणि आता अशा कामगारांची नोकरी जाण्याचा धोका सर्वाधिक आहे.
कोरोना व्हायरस संकटामुळे बर्याच देशांनी कारखाने, शाळा, रेस्टॉरंट्स, सार्वजनिक सेवा आणि रोजगारासाठीचे इतर मार्ग बंद केले आहेत, ज्यामुळे अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला आहे. आयएलओचे महासंचालक गाय रेडर म्हणाले की, ‘या साथीच्या आजारामुळे आणि नोकरीच्या संकटामुळे कामगारांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. लाखो कामगारांची कमाई न होणे म्हणजेच त्यांचे भविष्य संपण्यासारखे आहे. जगभरातील कोट्यवधी व्यवसाय सध्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत, कोट्यवधी कामगारांकडे उत्पन्नाचा मार्ग नाही, अन्न, सुरक्षा किंवा भविष्य नाही. त्यांच्याकडे बचत आणि पतपुरवठा करण्याचा पर्यायही नाही. जर आपण आता त्यांना मदत केली नाही तर त्यांचा नाश होईल.’
या संकटात ज्या क्षेत्रांना सर्वात जास्त फटका बसला आहे त्यामध्ये, उत्पादन, अन्न सेवा, हॉटेल उद्योग, घाऊक, किरकोळ आणि रिअल इस्टेट या क्षेत्रांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने म्हटले आहे की, या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कामकाजाच्या तासात 10.5 टक्के घट होऊ शकते. सर्वात मोठी घसरण अमेरिका, युरोप आणि मध्य आशियामध्ये दिसून येईल. (हेही वाचा: अमेरिकेत H1B Visa वर नोकरी करणाऱ्या 2 लाखाहून अधिकांचे भविष्य कोरोना व्हायरसमुळे धोक्यात; जूनमध्ये संपणार US मध्ये राहण्याची कायदेशीर मुदत)
आयएलओच्या म्हणण्यानुसार, लॉक डाऊनमुळे कामगारांच्या कमाईमध्ये आफ्रिका आणि अमेरिकेत 80 टक्के, युरोप आणि मध्य आशियामध्ये 70 टक्के आणि आशिया आणि पॅसिफिकमध्ये 21.6 टक्क्यांनी घट झाली आहे.