अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी, कोरोना विषाणू (Coronavirus) हा चीन (China) मधील वुहान लॅबमधून लीक झाला अथवा करण्यात आला आणि जगभरात हे संकट पसरले, असा दावा करणाऱ्या अहवालावर अमेरिका सतत नजर ठेवून असल्याचे सांगितले. या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात 153,800 लोक मरण पावले आहेत. ट्रम्प यांनी बुधवारी हे सांगितले व चौकशीचे आदेश दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी फॉक्स न्यूजच्या वृत्ताचा स्वीकार केला ज्यामध्ये हे नमूद केले आहे की, चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (Wuhan Institute of Virology)येथे कार्यरत असलेल्या एखाद्या इंटर्नने कोरोना विषाणू चुकून लीक केला असावा.
अमेरिकेच्या फॉक्स न्यूजने एका विशेष अहवालात म्हटले आहे की, चीनच्या वुहान लॅबमधून कोरोना विषाणू बाहेर आला आहे की नाही हे पाहण्यासाठी अमेरिका या प्रकरणाची विस्तृत चौकशी करणार आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, गुप्तहेर यंत्रणा तपास अधिकारी, लॅब आणि व्हायरसच्या रोगजनकांच्या सुरुवातीच्या उद्रेकाविषयी माहिती गोळा करीत आहेत. याबाबत ट्रंप यांना विचारले असता ते म्हणाले, 'कोरोना व्हायरसच्या उद्रेकासाठी चीन एका विशिष्ट प्रकारच्या वटवाघूळचा उल्लेख करीत आहे, परंतु असे कोणत्याही प्रकारचे वटवाघूळ त्या भागात आढळत नाही. अशा बॅटना त्या मांस झोनमध्ये विकले गेले नाही. तर त्या भागापासून 40 मैलांच्या अंतरावर असे वटवाघूळ आढळतात. हे जर सत्य असेल तर वूहानमध्ये हे विषाणू आलेच कसे?'
आता अमेरिका या गोष्टीचा तपास करीत आहे. दरम्यान चीनमध्ये बाहेरून आलेल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या वाढून 1,566 झाली आहे, तर मृतांची संख्या 4,632 वर पोचली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, मृतांमधील 50 टक्के रुग्ण संसर्गाचे केंद्रबिंदू वुहान शहरातील आहेत. वुहानमध्ये नवीन आकडेवारी समोर आल्यानंतर देशाच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) कोरोना विषाणूची सुधारित राष्ट्रीय आकडेवारी जाहीर केली आहे. नवीन आकडेवारीनुसार, शुक्रवारी संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 82,719 होती, त्यापैकी 4,632 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात अद्यापही 1058 रूग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 77,029 लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. (हेही वाचा: Nuclear Tests By China?; कोरोना व्हायरसचे संकट कमी होताच चीनने अणुचाचण्या सुरु केल्याचा अमेरिकेचा आरोप)
वुहान अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जाहीर केले की 16 एप्रिलपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या 325 नवीन घटनांसह 50,333 पर्यंत वाढली आहे, तर मृतांची संख्या 1290 मृतकांसह 3,896 वर पोहोचली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशांनी चीनवर कोरोना विषाणूचे प्रमाण कमी दाखवल्याचा, पारदर्शकतेचा अभाव आणि विषाणूची मुद्दाम उत्पत्ती केल्याचा आरोप केल्याने चीनने सुधारित आकडेवारी जाहीर केली आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये वुहानमधील ह्युआन सी फूड मार्केटमध्ये या कोरोना विषाणूची प्रकरणे प्रथम उघडकीस आली होती.