चीनला (China) कोरोना विषाणू महामारीचा मोठा फटका बसला आहे. गेली अनेक महिने चीन शून्य कोविड धोरण अवलंबत होते, मात्र आता त्यामध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. बीजिंगने कठोर कोविड-19 निर्बंध उठवल्यावर इथल्या व्यवसायामध्ये तेजी दिसून आली आहे. जगातील अव्वल कंझ्युमर आणि लक्झरी वस्तूंच्या कंपन्यांनी (Consumer and Luxury Goods Companies) चीनमध्ये कॉस्मेटिक्सपासून ते अगदी कंडोमपर्यंतच्या जवळजवळ सर्व गोष्टीची विक्री वाढल्याचे पाहिले आहे. अशाप्रकारे जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था साथीच्या रोगानंतर पुनरुज्जीवित होत आहे.
चीनच्या फॅक्टरी सेक्टरमध्ये फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ दिसून आल्यानंतर, बुधवारी रेकिट बेंकिसर, निव्हिया-निर्माते बेयर्सडॉर्फ, मोनक्लर आणि प्यूमा अशा लोकप्रिय कंपन्यांनी उत्साही प्रतिक्रिया दिल्या. बेयर्सडॉर्फचे मुख्य कार्यकारी व्हिन्सेंट वॉर्नरी (Vincent Warnery) म्हणाले की, कंपनीने चीनमध्ये पुन्हा व्यवसाय वाढीची चिन्हे पाहिली आहेत. देशातीत कोविड-19 निर्बंध उठून दळण-वळण सुरु झाल्याने जागतिक प्रवासी किरकोळ व्यवसाय (Global Travel Retail Business) वाढला आहे.
अतिशय अस्थिर अशा जानेवारीनंतर फेब्रुवारीपासून किरकोळ विक्रीमध्ये स्पष्ट उलाढाल दिसू लागली असल्याचे, वॉर्नरी यांनी एका ब्रीफिंगमध्ये सांगितले. वॉर्नरी म्हणाले की, चीनमध्ये मागणी वाढल्याने बेयर्सडॉर्फच्या अगदी प्रीमियम ला प्रेरी (La Prairie) पासून ते स्वस्त अशा युसेरिन, निव्हिया स्किनकेअर श्रेणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. चीनमधील पर्यटनामुळे शेजारील मकाऊ, हाँगकाँग, तैवान आणि अगदी जपानमध्येही विक्री करण्यात मदत होत आहे, असेही ते म्हणाले. (हेही वाचा: Origins of Covid-19: चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेतूनच बाहेर पडला कोविड-19 विषाणू; FBI डिरेक्टर Christopher Wray यांचा मोठा दावा)
नुरोफेन टॅब्लेट, कोल्ड रेमेडी लेमसिप आणि ड्युरेक्स बनवणाऱ्या रेकिट बेंकिसर (Reckitt Benckiser), कंपनीलाही लॉकडाउननंतर चीनमध्ये आपला व्यवसाय वाढत असल्याचे दिसत आहे. आपल्या केवाय जेली (KY Jelly) आणि ड्युरेक्स कंडोमचा (Durex Condoms) समावेश असलेल्या विभागाचा संदर्भ देत कंपनीचे अंतरिम मुख्य कार्यकारी निकांद्रो दुरांते यांनी सांगितले की, आमचा व्यवसाय चीनमध्ये चांगली कामगिरी करणार आहे याबद्दल मला शंका नाही.