Coca-Cola Special Cold Drink

सध्या उन्हाळा असल्याने भारतातील सर्व प्रदेशांमध्ये थंड पेयांची मागणी झपाट्याने वाढली आहे. अशात कोका-कोला (Coca-Cola), पेप्सी सारखे ब्रँड अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि प्रमोशनसह बाजारात उतरत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता कोका-कोलाने एका विशिष्ट धार्मिक समुदायासाठी विशिष्ट थंड पेय तयार केले आहे. कोका-कोलाने यहूदी समुदायासाठी म्हणजेच ज्यू लोकांसाठी पासओवर (Passover) सणासाठी विशेष पेय तयार केले आहे. या पेयाच्या बाटलीवर पिवळे टोपण लाबाण्यात आले आहे, ज्यामुळे ते वेगळे दिसते. हे पेय यहूदी आहार नियमांचे पालन करते आणि विशेषतः पासओवरच्या आठ दिवसांदरम्यान ते उपलब्ध असेल.

पासओवर हा यहूदी धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो यहूदी लोकांच्या इजिप्तमधील गुलामगिरीतून मुक्तीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हा सण आठ दिवस चालतो, आणि यंदा तो 12 एप्रिल 2025 रोजी सुरू झाला आणि 20 एप्रिलपर्यंत चालेल. या काळात, यहूदी समुदाय कठोर आहार नियमांचे पालन करतो, ज्याला ‘कोषेर’ नियम म्हणतात. सामान्यतः, यहूदी आहार नियम मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचे एकत्र सेवन करण्यास मनाई करतात आणि काही प्राण्यांचे मांस खाण्यास बंदी घालतात. परंतु पासओवरदरम्यान, हे नियम आणखी कठोर होतात. याकाळात मका, तांदूळ, सोयाबीन आणि इतर काही धान्ये आणि शेंगा खाण्यास मनाई आहे.

नियमित कोका-कोला पेयामध्ये हाय-फ्रुक्टोज कॉर्न सिरप (मक्यापासून बनवलेले स्वीटनर) असते, जे पासओवरच्या काळात निषिद्ध आहे. त्यामुळे, कोका-कोलाने या काळासाठी विशेष पेय तयार केले आहे, ज्यामध्ये कॉर्न सिरपऐवजी केन शुगर किंवा सुक्रोजचा वापर केला आहे. हे पेय कोषेर-फॉर-पासओवर प्रमाणित आहे आणि पिवळ्या टोपणाने ओळखले जाते, ज्यामुळे यहूदी ग्राहकांना ते सहज ओळखता येते. कोका-कोलाने पासओवरसाठी हे विशेष पेय बनवण्याची सुरुवात 1930 च्या दशकात केली, जेव्हा अटलांटातील रब्बी टोबियास गेफेन यांनी कंपनीला कोषेर नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहित केले. (हेही वाचा: Toxic Soil Crisis: जगभरातील मातीतील विषारी धातूंचे प्रदूषण वाढले; सुमारे 140 कोटी लोकांचे जीवन धोक्यात, अभ्यासात खुलासा)

1935 मध्ये कोका-कोलाने पहिल्यांदा हे विशेष पेय बाजारात आणले. हे पेय प्रामुख्याने इझराइलमधील यहूदी समुदायासाठी आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क, मियामी आणि लॉस एंजेलिससारख्या मोठ्या यहूदी लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांसाठी तयार केले जाते. ऑर्थोडॉक्स युनियनसारख्या कोषेर प्रमाणपत्र संस्था या पेयाची प्रामाणिकता तपासतात, ज्यामुळे त्याला धार्मिक विश्वासार्हता मिळते. हे पेय मुख्यत्वे  पासओवरच्या काळात आणि सीमित प्रमाणात उपलब्ध असते, यामुळे त्याची मागणी वाढते. हे पेय केवळ यहूदी समुदायासाठीच नाही, तर गैर-यहूदी ग्राहकांमध्येही लोकप्रिय आहे. कोका-कोलाचे हे विशेष पेय सांस्कृतिक संवेदनशीलतेचे उदाहरण आहे, कारण ते यहूदी समुदायाच्या धार्मिक गरजा पूर्ण करते. इजराइल, जिथे जगातील सर्वात मोठा यहूदी समुदाय आहे, हा या पेयाचा प्रमुख बाजार आहे.