चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग (Photo: Getty)

कोरोना विषाणूची (Coronavirus) हाताळणी करण्याबद्दल चिनी अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्यावर टीका करणे एका मोठ्या व्यावसायिकाला फारच महागात पडले आहे. चिनी राष्ट्राध्यक्षांचा जाहीरपणे निषेध केल्याबद्दल भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली या व्यावसायिकाला तुरुंगात टाकण्यात आले आहे. सरकारी रिअल इस्टेट कंपनीचे माजी अध्यक्ष रेन झिकियांग (Ren Zhiqiang) यांना भ्रष्टाचाराच्या (Corruption) आरोपाखाली तब्बल 18 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर, झिकियांग यांना याआधी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षामधून हद्दपार करण्यात आले होते.

बीजिंगच्या एका कोर्टाने रेन झिकियांगवर आरोप केला आहे की, झिकियांग भ्रष्टाचारासाठी दोषी आहेत आणि त्यांनी कोट्यवधी डॉलर्सची लाच घेतल्याचाही आरोप आहे. या आरोपावरून न्यायाधीशांनी त्यांना 18 वर्षे तुरूंगात आणि सहा लाख 20 हजार डॉलर्स दंड ठोठावला आहे. येथे कोर्टाने असेही म्हटले आहे की, झिकियांगने स्वत: चे सर्व आरोप मान्य केले आहेत आणि त्यांच्याकडून अवैध पैसेही वसूल केले गेले आहेत. परंतु सीएनएनच्या अहवालानुसार या चिनी अब्जाधीशांचा अपराध नक्कीच भ्रष्टाचार हा नव्हता, तर कोरोना साथीचा रोग योग्यप्रकारे हाताळला गेला नसल्याबद्दल त्यांनी चिनी अध्यक्षांवर टीका केली होती. जे लोक चीन सरकारविरूद्ध बोलतात त्यांना बर्‍याचदा भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगात टाकले जाते.

रेन झिकियांग यांचे ज्येष्ठ चिनी अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध आहेत. रिअल-इस्टेट सेवानिवृत्त व्यवसायीक रेन झिकियांग यांनी मार्च महिन्यात कोरोना व्हायरसच्या विषयावर जिनपिंग यांच्यावर टीका करत एक निबंध लिहिला होता. तेव्हापासून ते गायब होते, आता त्यांच्यावर भ्रष्टाचाराशी संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले. रेन यांना देण्यात आलेली ही शिक्षा इतर महत्वाच्या चिनी लोकांना एकप्रकारचा एक्प्रकारा संदेश आहे की, सरकारविरुद्ध जनतेसमोर उघडपणे केलेली टीका खपवून घेतली जाणार नाही. (हेही वाचा: चीन ने जगातील पहिल्या कोरोना नेजल स्प्रे वॅक्सिन च्या ट्रायलसाठी दिली परवानगी)

दरम्यान, रेन हे सरकारविरुद्ध उघडपणे बोलण्याबाबत ओळखले जातात. चीनमध्ये आणि जगभरात पसरलेल्या कोरोना संसर्गाबाबत चीनच्या राष्ट्रपतींवर टीका केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर रेनवर भ्रष्टाचार, लाच घेणे आणि सरकारी मालकीच्या कंपनीत आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे आरोप लावण्यात आले.