Population | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीनमध्ये (China) मुलांचा जन्मदर कमालीचा घसरला आहे. याआधी बातमी आली होती की, चीनला मागे टाकून भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल. आता चीनी सरकार देशातील लोकांना अधिक मुले होण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. जन्मदर वाढवण्यासाठी चीन सरकार नवनवीन योजना, निर्णय लागू करत आहे. या पार्श्वभुमीवर महाविद्यालयांनीही वेगवेगळे उपक्रम सुरू केले आहेत. मियायांग फ्लाइंग व्होकेशनल कॉलेजने (Mianyang Flying Vocational College) आपल्या विद्यार्थ्यांसाठी 'स्प्रिंग ब्रेक' (Spring Break) जाहीर केला आहे.

विद्यार्थ्यांना वसंत ऋतू अनुभवण्याची, निसर्गाच्या जवळ जाण्याची आणि प्रेमात पडण्याची संधी मिळावी यासाठी हा 'स्प्रिंग ब्रेक' चीनमधील महाविद्यालयांकडून दिला जात आहे. जागतिक प्रसारमाध्यमांमध्ये चीनच्या या कॉलेजच्या या उपक्रमाकडे विद्यार्थ्यांना 'प्रेम' करण्यासाठी दिलेली सुट्टी म्हणून पाहिले जात आहे. एनबीसी न्यूजनुसार, चीनमधील अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आठवडाभराचा 'स्प्रिंग ब्रेक' जाहीर करण्यात आला आहे.

फॅन मेई एज्युकेशन ग्रुप संचालित मियांग फ्लाइंग व्होकेशनल कॉलेजने 21 मार्च रोजी पहिल्यांदा अशा प्रकारची सुट्टी जाहीर केली होती. 'स्प्रिंग ब्रेक'च्या घोषणेनुसार, मियांग फ्लाइंग व्होकेशनल कॉलेजचे डेप्युटी डीन लियांग गुओहुई म्हणाले की, त्यांना आशा आहे की या सुट्टीच्या दिवसांत तरुण लोक निसर्ग आणि हिरवेगार पर्वत पाहण्यासाठी जाऊ शकतील आणि वसंत ऋतुचा आनंद घेऊ शकतील. ही बाब केवळ विद्यार्थ्यांच्या भावनांचा विकास करणार नाही, तर त्यांची शैक्षणिक क्षमता समृद्ध आणि सखोल करेल. याशिवाय या काळात विद्यार्थ्यांच्या प्रेमाचा शोधही पूर्ण होईल. (हेही वाचा: इटलीमध्ये लवकरच येणार इंग्रजी भाषेवर बंदी; उल्लंघन केल्यास होणार 89 लाखांपर्यंत दंड, सरकार आणत आहे कायदा)

इतर कॉलेजांनीही 1 एप्रिल ते 7 एप्रिल दरम्यान अशी सुट्टी जाहीर केली आहे. अशाप्रकारे चीनमध्ये विद्यार्थ्यांना स्प्रिंग ब्रेकचा आनंद घेत निसर्गावर प्रेम करण्यासाठी, जीवनावर प्रेम करण्यासाठी आणि प्रेम शोधण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांना स्प्रिंग ब्रेक दरम्यान आलेले अनुभव आणि केलेले काम मांडावे लागणार आहे. यामध्ये पार्टनरसह एक व्हिडीओ सादर करावा लागणार आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे की, चीनी महाविद्यालय प्रशासनाचे हे प्रयत्न चिनी सरकारच्या सूचनेनुसार जन्मदर वाढवण्याचे नवे मार्ग आहेत.