New Virus in China: वटवाघुळांमध्ये आढळून आला कोविडसारखा आणखी एक  धोकादायक BtSY2 विषाणू; पसरला तर होऊ शकतो विनाश
Virus | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

गेल्या तीन वर्षांपासून जगभरात कोरोना विषाणू (Coronavirus) चा कहर चालू आहे. अजूनही भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण समोर येत आहेत. या महामाराची सुरुवात चीनमधून झाली होती. आता चीनमधून पुन्हा एकदा जगासाठी एक वाईट बातमी आली आहे. चीनच्या वटवाघळांमध्ये एक नवीन आणि धोकादायक विषाणू आढळून आला आहे. या व्हायरसचे नाव BtSY2 आहे. या विषाणूची लक्षणे SARS-CoV-2 व्हायरससारखीच आहेत.

महत्वाचे म्हणजे, हा नवीन विषाणू मानवी शरीरात सहज प्रवेश करू शकतो. शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की हा नवीन विषाणू अतिशय धोकादायक आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात विनाशही होऊ शकतो. दक्षिण चीनमधील वटवाघळांमध्ये हा नवीन विषाणू आढळून आला आहे. चीनच्या युनान प्रांतातील वटवाघळांच्या शरीरात एकूण 5 धोकादायक विषाणू आढळले आहेत, जे मानव आणि प्राणी दोघांनाही अनेक आजार देऊ शकतात.

हे संशोधन सिडनी विद्यापीठ, युनान इन्स्टिट्यूट ऑफ एंडेमिक डिसीज कंट्रोल आणि शेनझेन येथील सन यात-सेन विद्यापीठाने केले आहे. या संशोधनासाठी चीनच्या युनान राज्यातील 15 प्रजातींची तपासणी करण्यात आली. एकूण 149 लघवीचे नमुने तपासण्यात आले. त्यात एकूण पाच विषाणू आढळून आले. ज्यामध्ये एक विषाणू कोरोनासारखा होता.

शास्त्रज्ञांना आढळले की, नवीन व्हायरस BTSY2 हा रिसेप्टर बाइंडिंग व्हायरस आहे जो मानवी पेशींना जोडू शकतो. चीनचा युनान प्रांत वटवाघुळांमध्ये आढळणाऱ्या विषाणूसाठी हॉट स्पॉट बनला आहे, त्यात आता कोरोनासारखा हा नवीन विषाणू आढळल्याने धोका वाढला आहे. नॉटिंगहॅम विद्यापीठातील व्हायरोलॉजिस्ट प्रोफेसर जोनाथन बॉल यांच्या म्हणण्यानुसार, ‘नवीन व्हायरस हा कोरोना विषाणूच्या आधीच अस्तित्वात असलेल्या फॉर्मच्या अनुवांशिक कोडमध्ये बदल करू शकतात, ज्यामुळे नवीन रोगजनकांचा म्हणजेच विषाणूंचा जन्म होऊ शकतो.’ (हेही वाचा: COVID Protests in China: चीनमधील कठोर निर्बंधांविरोधात रस्त्यावर उतरले लोक; लॉकडाउन संपवण्यासाठी दिल्या घोषणा)

असे मानले जाते की, वटवाघुळ हे एकाच वेळी अनेक व्हायरस स्वतःमध्ये ठेवू शकतात आणि नंतर मोठ्या प्रमाणावर ते पसरवू शकतात. दरम्यान, सध्या चीनमध्ये दररोज 26,000 हून अधिक कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत. गेल्या 10 दिवसांत त्यात दुपटीने वाढ झाली आहे. याच काळात भारतातील प्रकरणे जवळपास निम्मी झाली आहेत. गेल्या 24 तासात भारतात 347 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.