China: वुहानमधील Coronavirus ने बऱ्या झालेल्या 90 टक्के रुग्णांमध्ये उद्भवल्या फुफ्फुसांच्या समस्या; 5 टक्के रुग्णांना झाला पुन्हा Covid-19 चा संसर्ग
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

जगात सध्या अनेक देश कोरोना व्हायरसची (Coronavirus) झुंज देत आहेत. याचे केंद्र चीन (China) मधील वूहान (Wuhan) असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता चीन आणि वूहान मधील परिस्थिती बरीच निवळली असल्याच्या बातम्या मिळत आहेत. वूहानमधील कोरोनाचा धोका जरी आटोक्यात आला असला तरी, आता नवीन समस्या उभी राहिली आहे. वुहान शहरातील मोठ्या रुग्णालयातून बरे झालेल्या कोविड-19 रुग्णांच्या गटाच्या घेतलेल्या नमुन्यांपैकी जवळजवळ 90 टक्के रुग्णांना फुफ्फुसांची (Lungs) समस्या निर्माण झाल्याचे समोर आले आहे. नुकताच याबाबत झालेला अभ्यास प्रकाशित करण्यात आला.

यासह 5 टक्के रुग्णांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना आयसोलेशनमध्ये राहावे लागले आहे. बुधवारी माध्यमांतून ही बातमी समोर आली. वुहान विद्यापीठाच्या झोंगनान हॉस्पिटलच्या (Zhongnan Hospital) अतिदक्षता विभागाचे संचालक पेंग झिओंग यांच्या नेतृत्वाखालील एक पथक, एप्रिल महिन्यापासून बरे झालेल्या 100 रुग्णांची पुन्हा तपासणी करत आहेत. या एक वर्षाच्या कार्यक्रमाचा पहिला टप्पा जुलैमध्ये संपला. अभ्यासामध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णांचे सरासरी वय 59 वर्षे आहे.

ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, पहिल्या टप्प्यातील निकालांनुसार, 90 टक्के रुग्णांचे फुफ्फुसे अद्याप खराब झालेल्या अवस्थेत आहेत. म्हणजेच त्यांच्या फुफ्फुसांच्या वायुवीजन (Ventilation) आणि गॅस एक्सचेंजची कार्ये निरोगी लोकांसारखी झाली नाहीत. पेंगच्या टीमने रूग्णांवर सहा मिनिटांची चालण्याची चाचणी घेतली. त्यांना आढळले की, बरे झालेल्या रुग्णांना सहा मिनिटांत फक्त 400 मीटर चालणे शक्य होते, तर त्यांचे निरोगी सहकारी तितक्याच वेळेत 500 मीटर चालू शकले.

डॉ. लिआंग टेंगसिओ यांचा हवाला देत बातमीत म्हटले आहे की, काही रूग्ण ज्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे त्यांनाही ऑक्सिजन मशीनची आवश्यकता भासली आहे. या रिसर्चमध्ये असेही आढळले आहे की, बी पेशींची पातळी कमी असल्याने 100 पेशंटची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे ठीक झाली नाही. तसेच 100 रूग्णांपैकी 10 टक्के रुग्णांमध्ये कोरोना व्हायरसच्या विरूद्धची प्रतिपिंडे गायब झाले आहेत.