China is Sinking: शहरी पायाभूत सुविधा आणि भूजल शोषणामुळे बुडत आहे चीनची 45% शहरी जमीन; किनारपट्टी भागात पुराचा धोका वाढला
शांघाय (Photo Credit: Pixabay)

China is Sinking: चीनला (China) आपल्या आर्थिक ताकदीचा खूप अभिमान आहे. त्यांच्या अभिमानाचे एक मुख्य कारण म्हणजे चीनमधील आधुनिक शहरे हे आहे. चीनची शहरी लोकसंख्या 90 कोटींहून अधिक आहे. मात्र यापैकी अनेक शहरांवर एक भयंकर धोका निर्माण झाला आहे. चीनची किनारपट्टीवरील शहरे बुडण्याच्या मार्गावर आहेत. एका नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की, चीनच्या शहरांखालील जमीन वेगाने बुडत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात पुराचा धोका वाढला आहे.

गुरुवारी सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, चीनच्या जवळपास अर्ध्या शहरी भागात हा धोका आहे. संशोधकांनी 700 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शांघाय आणि बीजिंगसह 82 शहरांचा अभ्यास केला. उपग्रह डेटाच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की चीनची 45% शहरी जमीन दरवर्षी 3 मिलीमीटरपेक्षा जास्त वेगाने बुडत आहे, तर 16% जमीन दरवर्षी 10 मिलीमीटरपेक्षा जास्त वेगाने बुडत आहे.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, भूजल पातळीत घट आणि वेगाने होणारा मानवी विस्तार यामुळे हे घडत आहे. चीनची 29 टक्के लोकसंख्या या जोखमीच्या भागात राहते. साउथ चायना नॉर्मल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की, जमीन कमी झाल्यामुळे चीनच्या शहरी जीवनाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, चीनला दरवर्षी 7.5 अब्ज युआन ($1.04 बिलियन) नुकसान होत आहे. अभ्यासानुसार, पुढील 100 वर्षांमध्ये, चीनच्या किनारपट्टीचा एक चतुर्थांश भूभाग समुद्रसपाटीच्या खाली जाऊ शकतो. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये जमीन कमी होण्याची समस्या जुनी आहे. शांघाय आणि टियांजिनच्या घटाचे पुरावे 1920 मध्ये सापडले. गेल्या शतकात शांघाय 3 मीटरपेक्षा जास्त बुडाले आहे. (हेही वाचा: Earthquake in Taiwan: तैवान पुन्हा हादरले, महिनाभरात दुसरा भुकंप; 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद)

संशोधकांच्या मते, चीनमध्ये जमीन कमी होण्याचे कारण म्हणजे वाढते शहरीकरण,  शहरी पायाभूत सुविधा आणि त्यामुळे भूजलाचे मोठ्या प्रमाणावर होणारे शोषण हे आहे. अनेक शहरांमध्ये जमिनीतून इतके पाणी काढले जाते की, ते पुन्हा भरण्यास वेळ मिळत नाही. हवामान बदलामुळे दुष्काळामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. जड इमारतींमुळे जमिनीवरही दबाव येतो.