Covid-19 Vaccine पुरवल्याबद्दल हनुमानाचा फोटो ट्विट करत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष Jair Bolsonaro यांनी मानले भारताचे आभार; पंतप्रधान मोदींनी दिले 'हे' उत्तर
Brazil President Jair Bolsonaro (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगाला ग्रासले होते. या महामारीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर बहुतांशजण कोरोनाच्या कचाट्यात सापडले. दरम्यान, भारतात लसीकरण मोहिमेला 16 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर भारत अनेक देशांना कोविड-19 वरील लसीचा पुरवठा करत आहे. ब्राझीलने देखील लसीची मागणी केली होती. त्या मागणीचा मान राखत भारताकडून कोविड-19 लस पुरवल्याबद्दल ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो (Brazil President Jair Bolsonaro) यांनी हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत भारताचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसोनारो यांनी लसीची मागणी केली होती. त्यानंतर भारतानं लस पुरवण्यास सुरुवात केली. त्यावर संजीवनी घेऊन येणाऱ्या हनुमानाचा फोटो ट्विट करत राष्ट्रपतींनी भारताचे आभार मानले आहेत. यासाठी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, "नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, जागतिक संकटावर मात करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये एक पार्टनर मिळाल्याने ब्राझीलला अभिमान वाटत आहे. भारतातून ब्राझीलला लस पाठवल्याबद्दल धन्यवाद."

Jair Bolsonaro Tweet:

यावर पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रिट्विट करत उत्तर दिले आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "राष्ट्रपती बोलसोनारोजी, कोविड-19 संकटात एकत्रित लढा देण्यासाठी ब्राझीलचा विश्वासू सहकारी होणं हा आमचा सन्मान आहे. आरोग्यसेवेतील सहकार्य भारत अधिक प्रबळ करत राहील."

PM Modi Tweet:

ब्राझील शिवाय भारताने बांग्लादेश, मालदीव या देशांनाही कोविड-19 लसीचा पुरवठा केला आहे. त्याचबरोबर भारतातही पहिल्या टप्प्यातील लसीकरण सुरु असून त्यात आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्स यांचा समावेश करण्यात आला आहे.