दक्षिण आफ्रिकेतील (South African) लेखक डेमन गॅलगट (Damon Galgut) यांना त्यांच्या 'द प्रॉमिस' (The Promise) या कादंबरीसाठी यंदाचा प्रतिष्ठित ‘बुकर पुरस्कार’ (Booker Prize 2021) जाहीर झाला आहे. गॅलगट यांची ही कादंबरी दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषी इतिहासाच्या पार्श्वभुमीवर एका श्वेत कुटुंबाच्या कथेवर आधारित आहे. द न्यू यॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डेमन यांची त्यांच्या शेवटच्या दोन पुस्तकांसाठी निवड करण्यात आली होती, ज्यामध्ये या दक्षिण आफ्रिकेतील एका श्वेत कुटुंबाच्या चित्रणासाठी त्यांना जगातील सर्वात प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गॅलगट यांनी तिसऱ्यांदा पुरस्कारासाठी दावेदारांच्या अंतिम यादीत प्रवेश केला. यापूर्वी 2003 मध्ये 'द गुड डॉक्टर' आणि 2010 मध्ये 'इन अ स्ट्रेंज रूम'साठी त्यांनी स्पर्धकांच्या अंतिम यादीत स्थान मिळविले होते, परंतु दोन्ही वेळा ते पुरस्कार जिंकू शकले नाहीत. यावेळी गॅलगट हे विजयाचे प्रबळ दावेदार होते. असे असूनही या पुरस्काराने आपल्याला धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. बुकरच्या न्यायाधीशांनी डेमन यांच्या कादंबरीच्या असामान्य वर्णनात्मक शैलीची प्रशंसा केली, असे द न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. गॅलगट यांना या पुरस्काराच्या रूपाने 50,000 पाउंड (69,000 डॉलर) रक्कम मिळाली आहे.
'द प्रॉमिस' हे डेमन यांचे नववे पुस्तक आहे. 'द प्रॉमिस' ही शॉर्टलिस्ट केलेल्या सहा कादंबऱ्यांपैकी एक होती आणि तिच्या कलात्मकतेसाठी ती सर्वांना खूप आवडली. या वर्षीच्या बुकर पारितोषिकाच्या शॉर्टलिस्टमध्ये तीन फायनलिस्टसह अमेरिकन लेखकांनी पुन्हा एकदा वर्चस्व गाजवले. ज्यामध्ये 'बेविल्डरमेंट'साठी रिचर्ड पॉवर्स, 'ग्रेट सर्कल'साठी मॅगी शिपस्टेड आणि 'नो वन इज टॉकिंग अबाऊट धिस'साठी पॅट्रिशिया लॉकवुड हे फायनल लिस्टमध्ये होते. (हेही वाचा: Afghanistan: वडिलांनी आपली 9 वर्षांची लेक विकली 55 वर्षांच्या व्यक्तीला; कुटुंबाचे पोट भरण्यासाठी काळजावर दगड ठेऊन केला व्यवहार)
इंग्रजीत लिहिलेल्या आणि ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीला दरवर्षी दिला जाणारा बुकर पारितोषिक यंदा 158 पैकी डेमन गॅलगटच्या कादंबरीला मिळाला. गेल्या वर्षी हा पुरस्कार स्कॉटिश लेखक डग्लस स्टुअर्ट यांना 'शॅगी बेन'साठी देण्यात आला होता. बुकर पारितोषिक जिंकणारे गलगट हे दक्षिण आफ्रिकेतील तिसरे कादंबरीकार आहेत. यापूर्वी हा पुरस्कार 1974 मध्ये नादिन गॉर्डिमर आणि 1983 आणि 1999 मध्ये जेएम कोएत्झी यांना देण्यात आला आहे.