Israel-Palestine War | (PC - ANI/X)

Israeli Air Attack On Refugee Camp: इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. युद्धात इस्रायल हमासबरोबरच दहशतवादी संघटना हिजबुल्लाहशीही लढत आहे. हमास आणि हिजबुल्ला या दोन्ही दहशतवादी संघटना इस्रायलवर हल्ले करत आहेत. इस्रायलही प्रत्युत्तर देत आहे आणि हल्ले करत आहे. दरम्यान, इस्रायलने शनिवारी रात्री गाझामध्ये हवाई हल्ला केला, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला.

शनिवारी रात्री इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात निर्वासित छावणीत राहणारे किमान 51 पॅलेस्टिनी ठार झाले. त्यात बहुतांश महिला आणि लहान मुले होती. यासोबतच गाझा पट्टीतील अनेक घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. मोठमोठ्या इमारतीही जमीनदोस्त झाल्या आहेत. गाझामध्ये इस्रायलच्या हवाई दलासह भूदलही तैनात आहे. (हेही वाचा -Israel-Hamas War: 'गाझा बनले हजारो मुलांसाठी स्मशानभूमी'; UN ने व्यक्त केली चिंता)

गाझामधील हमासच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायली हल्ले सुरूच आहेत. शनिवारी 231 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 9488 पॅलेस्टिनी ठार झाले असून त्यात 3900 मुले आणि 2509 महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 24 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याच वेळी, वेस्ट बँक परिसरात इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात किमान 140 लोकांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायलच्या एरो क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने इलात शहरातील अरवा येथे रॉकेट नष्ट केले, असे इस्रायली संरक्षण दलाने सांगितले. हे रॉकेट गाझा पट्टीतून डागण्यात आले होते. हमासने रॉकेट डागण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हमासने अनेक अय्याश-250 रॉकेट डागले. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.