लॅंडिंग करताना बोइंग 737 विमान नदीत कोसळले; सर्व 136 प्रवासी सुरक्षित
Boeing 737 (Photo Credits: Twitter, Jax Sheriff's Office)

विमानप्रवास आणि त्यासंदर्भात घडलेले अपघात यांच्या अनेक घटना आपण पहिल्या असतील, आताही असाच एक अपघात घडला आहे. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये (Florida) बोइंग 737 (Boeing 737) हे प्रवासी विमान लॅंडिंग करताना नदीत कोसळले आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. या विमानात 136 प्रवासी होते, मात्र हे सर्व प्रवासी पूर्णतः सुखरूप असल्याची माहिती नौसेना एयर स्टेशन जॅक्सनविल (Jacksonville) यांनी दिली आहे. लॅंडिंग करताना हे विमान घसरल्याने ते सरळ नदीत जाऊन कोसळले.

बोइंग 737 हे विमान क्युबावरून येत असताना लॅंडिंग करताना हे विमान घसरून रनवे वरुन थेट सेंट जॉन्स नदीत कोसळले. विमान बुडाले नसल्याने जीवितहानी टाळली गेली. घटनास्थळी जेएसओ मरीन यूनिटला बोलवण्यात आले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर विमानातील इंधन हे नदीमध्ये मिसळू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बाहेर काढण्यात आलेल्या सर्व प्रवाशांना नजीकच्या इस्पितळात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.