भारतामधील अनेक राज्यांमध्ये आपली सत्ता स्थापन केल्यानंतर आता भाजपची (BJP) नजर शेजारील देशांवर असल्याचे दिसून येत आहे. श्रीलंका आणि नेपाळमध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार होत असल्याच्या बातम्या येत होत्या. आता या वृत्ताचे श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाने (Sri Lanka Election Commission) खंडन केले आहे. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाने सांगितले की, देशातील निवडणूक कायदा अशा प्रकारच्या व्यवस्थेस परवानगी देत नाही. श्रीलंकेचा निवडणूक कायदा कोणत्याही परदेशी पक्षाला श्रीलंकेत काम करू देत नाही. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाचे प्रमुख निमल पंचिवा (Nimal Punchihewa) यांनी सोमवारी हे सांगितले.
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचा हवाला देत मीडिया अहवालात असा दावा केला गेला होता की, भाजपा श्रीलंका आणि नेपाळमध्ये विस्तार करण्याचा विचार करीत आहे. आता श्रीलंका निवडणूक आयोग प्रमुखांनी या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाचे प्रमुख निमल पंचिवा यांनी सोमवारी भारतीय सत्ताधारी पक्ष, भारतीय जनता पार्टी श्रीलंकेत राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करीत असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. ‘श्रीलंकेचा कोणताही राजकीय पक्ष परदेशातील कोणत्याही पक्षाशी किंवा गटाशी संबंध ठेऊ शकतो, परंतु आमचा निवडणूक कायदा इतर कोणत्याही परदेशी पक्षाला श्रीलंकेत काम करू देत नाही,’ असे पंचिवा म्हणाले.
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देब यांनी नुकतेच केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्या दूरदृष्टीबद्दल सांगितले होते. ते म्हणाले होते की, श्रीलंका आणि नेपाळमध्येही भाजपाचा विस्तार करायचा आहे. कार्यकर्त्यांना संबोधित करताना देब म्हणाले होते की, ‘अमित शहा जेव्हा पक्षाचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले होते की, अजून श्रीलंका आणि नेपाळमध्ये भाजपाचा विस्तार करून तिथे विजय प्राप्त करणे बाकी आहे.’ मात्र आता असे काही होणार नसल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: Pangong lake मधून चीनी सैन्य माघारी, टेंट काढत टॅंक घेत असलेल्या PLA जवानांचा व्हिडिओ प्रसिद्ध (Watch Video)
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी अध्यक्ष गोताबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांचे बंधू बेसिल म्हणाले होते की, त्यांनी भाजपा किंवा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या धर्तीवर Sri Lanka Podujana Peramuna सत्तारूढ मॉडेल बनवण्याची कल्पना केली होती.