Bill Gates | (Photo Credits: Twitter)

जगातील चौथी श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स (Bill Gates) यांनी खूप मोठी शेतजमीन (Farmland) विकत घेतली आहे. मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी अमेरिकेच्या वेगवेगळ्या 18 राज्यांत एकूण 2 लाख 42 हजार एकर लागवडीची जमीन खरेदी केली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, ते या जमीनीवर स्मार्ट सिटी बनवतील. शेतजमिनीव्यतिरिक्त, बिल यांनी इतरही बरीच जमीन खरेदी केली आहे. त्यांची पत्नी मेलिंडा गेट्सकडेही फार मोठ्या प्रमाणावर जमीन आहे. त्यांच्या बहुतेक पोर्टफोलिओमध्ये शेतीची जमीन समाविष्ट आहे आणि त्यात 25,750 एकर Transitional Land आणि 1,234 एकर Recreational Land चा समावेश आहे.

लँड रिपोर्टनुसार (The Land Report) गेट्सची सर्वात जास्त जमीन लुझियानामध्ये 69,071 एकर, अर्कान्सासमध्ये 47, 927 एकर आणि नेब्रास्कामध्ये 20,588 एकर आहे. याव्यतिरिक्त, त्यांच्याकडे फिनिक्स, एरिझोना पश्चिमेस 25,750 एकर Transitional Land देखील आहे. अशाप्रकारे 242,000 एकर शेतीसह गेट्स कुटुंब आता देशातील उर्वरित जमीनदारांपेक्षा खूप पुढे गेले आहेत. 2018 मध्ये त्यांनी वॉशिंग्टनमध्ये 16 हजार एकर जमीन खरेदी केली. वॉशिंग्टनमध्ये खरेदी केलेल्या जागेपैकी हार्स हेव्हन हिल्समध्ये 14.5 हजार एकर जमीन खरेदी केली गेली. या जागेच्या बदल्यात त्यांना सुमारे 1251 कोटी रुपये द्यावे लागले होते. 2018 मध्ये खरेदी केलेली ही सर्वात महाग जमीन होती. (हेही वाचा: Car Free, Road Free City: Saudi Arabia चा प्रिन्स मोहम्मद बिन सलमान उभारणार गाड्या व रस्ते नसणारे शहर; जाणून घ्या काय असेल खास)

इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या शेत जमिनीचे ते काय करणार आहेत याबाबत अजूनतरी अधिकृतरित्या माहिती समोर आली नाही. या बाबत कॅसकेड इन्व्हेस्टमेंट कंपनीनेही फारशी माहिती दिली नाही. दरम्यान, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने 2008 मध्ये जाहीर केले की, ते आफ्रिका आणि जगातील अन्य विकसनशील प्रदेशातील छोट्या शेतकर्‍यांना पीक उत्पादन वाढविण्यास आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत करतील. चांगल्या प्रकारची अंडी देणाऱ्या कोंबड्या आणि जास्त व उच्च प्रतीचे दुध देणाऱ्या गाईबाबत संशोधन करण्यास ते मदत करणार आहेत.