लेबनॉनची (Lebanon) राजधानी बेरूत (Beirut) येथे 4 ऑगस्ट, मंगळवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटामध्ये मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 200 च्यावर पोहोचली आहे, तर 6000 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. अशात लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब (Hassan Diab) यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यासह संपूर्ण कॅबिनेटने बेरूतमध्ये झालेल्या प्राणघातक स्फोटाच्या निषेधांदरम्यान आपला राजीनामा सादर केला आहे. बेरूतमध्ये झालेल्या स्फोटानंतर लोक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारविरूद्ध आक्रोश शिगेला पोहोचला आहे. देशात अनेक ठिकाणी सध्याच्या सरकार विरुद्ध आंदोलने सुरु आहेत.
चार वरिष्ठ मंत्र्यांनी यापूर्वीच राजीनामा दिला होता. न्यायमंत्री मेरी क्लॉड नजमी यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच लेबनॉनचे अर्थमंत्री गाझी वझनी यांनी राजीनामा दिला. रविवारी माहितीमंत्री मनाल अब्देल समद आणि पर्यावरण मंत्री डॅमियानोस कट्टर यांनी सरकार सोडले होते. आरोग्यमंत्री हम्मद हसन यांनी पत्रकारांशी बोलताना संपूर्ण सरकारने राजीनामा दिल्याची पुष्टी केली. ते म्हणाले की, पंतप्रधान डायब राजीनामा सादर करण्यासाठी राष्ट्रपती राजवाड्यात जात आहेत. त्यांच्या राजीनाम्यांदरम्यान, बेरूत येथे हिंसक निदर्शने करण्यात आली. शेकडो निदर्शकांनी संसदेच्या रस्त्यावर गोंधळ घातला व सुरक्षा कर्मचार्यांवर दगडफेक केली. (हेही वाचा: बेरूत स्फोटातील मृतांची संख्या पोहोचली 157 वर, 5000 हून अधिक जखमी; विविध देशांतून मदतीचा ओघ सुरु, भारतही करणार सहाय्य)
शिया मिलिशिया गट हिज्बुल्लाह यांचे पाठबळ असलेले लेबनॉनचे अध्यक्ष मिशेल अऑन (Michel Aoun) यांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलक करीत आहेत. पंतप्रधान हसन दियाब यांनी सोमवारी सायंकाळी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर देशाला पाठवलेल्या संदेशात स्वत: आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. दियाब यांच्या म्हणण्यानुसार, राजीनामा देऊन ते लोकांबरोबर उभे राहू शकतील आणि त्यांच्या बाजूने परिवर्तनासाठी लढा देऊ शकतील. पंतप्रधानांनी लेबनॉनमध्ये आलेल्या या संकटासाठी आधीच्या भ्रष्ट राजकारण्यांना दोषी ठरवले. लेबनीजच्या न्यायाधीशांनी आज स्फोट प्रकरणी राज्य सुरक्षा प्रमुख मेजर जनरल टोनी सलीबाकडे चौकशी करण्यास सुरवात केली.
दरम्यान, लेबनॉनची राजधानी बेरूत येथे मंगळवारी संध्याकाळी किनाऱ्याजवळ उभे असलेल्या जहाजात भीषण स्फोट झाला. हे जहाज फटक्यांनी भरलेले होते व त्यामुळे झालेला स्फोट इतका भीषण होता की जणू काही बॉम्बस्फोट झाल्यासारखे वाटले. हा स्फोट इतका भयानक होता की 10 किमीच्या परिघामधील घरांचे नुकसान झाले. बेरूतचे राज्यपाल मरवान अबूद यांनी बुधवारी सौदी अरेबियाद्वारे संचालित टीव्ही स्टेशन अल-हदसला सांगितले की या स्फोटामुळे सुमारे 10 ते 15 अब्ज डॉलर्स इतके नुकसान झाले आहे. ते म्हणाले की सुमारे तीन लाख लोक बेघर झाले आहेत. अशात आता अनेक देश या संकटाच्या वेळी लेबनॉनला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.