पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या निषेध मोर्चादरम्यान पंजाब प्रांतात गुरुवारी त्यांच्या कंटेनर-ट्रकवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गोळी लागली व ते थोडक्यात बचावले. सध्या त्यांची तब्येत ठीक आहे. त्यानंतर आता एएफपीच्या वृत्तानुसार, इम्रानवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, हल्लेखोराने अटक केल्यानंतर सांगितले की, तो इम्रान खानला मारण्यासाठी आला होता. तो म्हणाला की, माजी पंतप्रधान जनतेची दिशाभूल करत आहेत, ज्यांना शिक्षा देण्यासाठी तो आला होता.
फैसल बट असे हल्लेखोराचे नाव आहे. फैसलने हा निर्णय अचानक घेतल्याचे सांगितले. त्याच वेळी, त्याच्या या निर्णयामागे कोणाचाही हात नसल्याचेही त्याने सांगितले. वृत्तानुसार, दोन हल्लेखोर आले होते, त्यापैकी एक मारला गेला. तर एकाला पोलिसांनी अटक केली. इम्रान खानच्या पायाला गोळी लागली आहे, मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. इम्रान खान यांनी या हल्ल्याबाबत ट्विट केले आहे. दुसरे आयुष्य मिळाल्यासारखं वाटतेय, असे ते म्हणाले.
🚨I wanted to kill Imran Khan only, attacker told Media. pic.twitter.com/1EaE1o7q6h
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) November 3, 2022
पंजाबमधील वजिराबाद शहरातील अल्लावाला चौकात अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, या गोळीबारात इम्रानसह किमान 4 जण जखमी झाले आहेत. पीटीआयचे फारुख हबीब यांनी पक्षाचे प्रमुख इम्रान खान गोळीबारात जखमी झाल्याची पुष्टी केली आहे. इम्रान खान यांच्या कंटेनरजवळ झालेल्या गोळीबारात पीटीआयचे नेते फैसल जावेद हेही जखमी झाले आहेत. तेहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) निषेध मोर्चाचा गुरुवारी सातवा दिवस आहे.
(हेही वाचा: Vladimir Putin यांना स्वादुपिंडाचा कर्करोग आणि पार्किन्सन आजाराने ग्रासले? गुप्तचर कागदपत्रांमध्ये मोठा खुलासा)
इम्रान खान यांच्यावरील या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा एकदा रक्तरंजित खेळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्यावरही एका रॅलीत आत्मघातकी हल्ला झाला होता ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला होता. सध्या त्यांचा मुलगा बिलावल भुट्टो हे पाकिस्तान सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री आहेत, ज्यांच्या विरोधात इम्रान खान यांनी आंदोलन सुरू केले आहे. इम्रान खान देशात लवकरात लवकर नव्या निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत आणि आपल्या मागण्या घेऊन ते इस्लामाबादच्या दिशेने लाँग मार्च काढत आहेत.