Ukraine Russia War: युक्रेनमधील Sumy येथे रशियन बॉम्बस्फोटात 2 मुलांसह 18 लोकांचा मृत्यू
War| Representational Image (Photo Credits: Pixabay)

Ukraine Russia War: युक्रेनच्या सुमी शहरावर (Sumy City) रशियन हल्ल्यात किमान 18 लोक ठार झाले. वृत्तसंस्था एएफपीने यासंदर्भा माहिती दिली. मृतांमध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. हा रशियन हल्ला कीवपासून 350 किमी अंतरावर असलेल्या सुमी शहरात झाला. याआधी, ओख्तिरका येथील शाळेवर बॉम्ब टाकून 7 वर्षीय युक्रेनियन मुलीचा मृत्यू झाला होता. मुलीच्या आजोबांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते.

दरम्यान,भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सांगितले की, रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना वारंवार आवाहन करूनही, पूर्व युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यात आलेला नाही. याबद्दल आम्ही चिंतेत आहोत. (वाचा - Ukraine Russia War: 'मी कोणाला घाबरत नाही', देश सोडण्याच्या वृत्तावर राष्ट्राध्यक्ष Volodymyr Zelenskyy यांनी व्हिडिओ जारी करून केला दावा)

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा आज तेरावा दिवस आहे. 24 फेब्रुवारीपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याने युद्धाला सुरुवात झाली. आतापर्यंत रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. तिन्ही फेऱ्यांमधील चर्चा निष्फळ ठरल्या आहेत.

यापूर्वी युक्रेनने खार्किवमध्ये रशियाचे मेजर जनरल विटाली गेरासिमोव्ह यांची हत्या केल्याचा दावा केला होता. मेजर जनरल विटाली गेरासिमोव्ह यांनी 2014 मध्ये रशियाच्या क्रिमियावर ताबा मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. क्राइमियाच्या जोडणीसाठी त्यांना पदकही देण्यात आले.

दरम्यान, रशियाने युक्रेनमधील चार शहरांमध्ये युद्धविराम जाहीर केला आहे. चेर्निहाइव्ह, कीव, सुमी, खार्किव आणि मारियुपोलमध्ये युद्धविराम घोषित करण्यात आला आहे. रशियाने नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सोमवारी सकाळपासून युद्धविरामासह अनेक भागात मानवतावादी कॉरिडॉर उघडण्याची घोषणा केली आहे.