पोटदुखी (Stomach Pain) ही एक सामान्य समस्या आहे. परंतु कधीकधी ती खूप धोकादायक रूपही धारण करू शकते आणि त्यानंतर रुग्णाला ऑपरेशनची आवश्यकता भासू शकते. अशीच एक बातमी समोर आली आहे जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तर एक व्यक्ती पोटदुखीची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे पोहचली. तेव्हा तपासणीमधून जे सत्य बाहेर आले ते पाहून डॉक्टरही अचंबित झाले. ही 33 वर्षीय व्यक्ती पोटदुखीची तक्रार घेऊन इजिप्तमधील असवान विद्यापीठात पोहोचली होती. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा या व्यक्तीच्या पोटात चक्क मोबाईल फोन (Mobile Phone) असल्याचे दिसून आले.
महत्वाचे म्हणजे गेल्या 6 महिन्यांपासून या व्यक्तीच्या पोटात हा मोबाईल आहे. ही गोष्ट समजताच सर्वांनाच धक्का बसला. अखेर मोठ्या शर्थीने डॉक्टरांनी ऑपरेशन करून तो मोबाईल फोन बाहेर काढला. डॉक्टरांनी प्रथम पोटदुखी, आतड्यांसंबंधी आजार, पोटाचा संसर्ग अशा गोष्टींचे उपचार सुरु केले, मात्र त्यानंतरही रुग्णाची पोटदुखी थांबली नाही तेव्हा शस्त्रक्रिया करावी लागली.
पण, मोबाईल फोन त्या व्यक्तीच्या पोटात कसा गेला हे कोणीही समजू शकत नाही. रुग्णाने कबूल केले की त्याने मोबाईल फोन गिळला होता आणि त्याला वाटले की हा फोन स्वतः बाहेर येईल. मात्र तसे झाले नाही व गेले सहा महिन्यांपासून त्याला पोटदुखीचा त्रास होत आहे. परंतु या वेदनाकडे तो दुर्लक्ष करत राहिला, जेव्हा या वेदना सहनशक्तीच्या पलीकडे गेल्या तेव्हा तो रुग्णालयात आला. या व्यक्तीने सांगितले की त्याला खाण्यापिण्यातही त्रास होऊ लागला होता. (हेही वाचा: उत्तर प्रदेश: 18 वर्षीय तरुणाच्या पोटातून डॉक्टरांनी सुमारे अडीच तास शस्त्रक्रिया करून काढल्या 300 ग्रॅम वजनाच्या लोखंडी वस्तू)
दरम्यान, याआधी उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये एका 18 वर्षीय तरुणाच्या पोटातून डॉक्टरांनी सुमारे अडीच तास शस्त्रक्रिया करून 300 ग्रॅम वजनाच्या लोखंडी वस्तू काढल्या होत्या. या मुलाच्या पोटातून डॉक्टर्संनी लोखंडी खिळे, 4 इंची लांबीची सळी अशा एकूण 36 वस्तू काढल्या.