Kabul Explosion: काबूलमध्ये शाळेत 3 बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
Blasts In Kabul School (PC - Twitter)

Kabul Explosion: अफगाणिस्तानची राजधानी काबूल (Kabul) मध्ये 3 जोरदार स्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. हे स्फोट पश्चिम काबूलमध्ये झाले आहेत. पहिला स्फोट मुमताज शाळेत झाला. या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुसरा स्फोट दुसऱ्या शाळेजवळ झाला.

अफगाण सुरक्षा आणि आरोग्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी पश्चिम काबुलमधील एका हायस्कूलमध्ये तीन स्फोट झाले. ज्यात अनेक लोक ठार झाले. शेजारील अनेक रहिवासी शिया हजारा समुदायाचे आहेत. हे एक वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याक आहेत. ज्यांना इस्लामिक स्टेटसह सुन्नी दहशतवादी गटांनी वारंवार लक्ष्य केले आहे. (हेही वाचा - South Africa Floods: दक्षिण आफ्रिकेत महापूर, 400 जणांचा मृत्यू; 40,000 बेघर; राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय आपत्तीची घोषणा)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम काबूलमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. या स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

अफगाणिस्तानात हवाई हल्ले -

विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्ये शनिवारी पाकिस्तानी हवाई दलाने हवाई हल्ले केले. पाकिस्तानी हवाई दलाच्या खोस्त आणि कुनार प्रांतात हवाई हल्ल्यात 47 जण ठार झाले. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी आग्नेय खोस्त प्रांतातील स्पराई जिल्ह्यात आणि पूर्व कुनार प्रांतातील शल्तान जिल्ह्यात वझिरिस्तानच्या निर्वासितांवर हवाई हल्ले केले. अफगाणिस्तानने पाकिस्तानी हवाई दलाच्या कारवाईचा तीव्र निषेध केला. परराष्ट्र मंत्रालयाने काबूलमधील पाकिस्तानचे राजदूत मन्सूर अहमद खान यांना या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून बोलावले. यानंतर पाकिस्तानने सांगितले की, अफगाणिस्तानने पाकिस्तान-अफगाण सीमेभोवतीचा परिसर सुरक्षित करून दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करावी.

त्याचवेळी, अफगाणिस्तानमधील संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला खावराजिमी म्हणाले की, कोणत्याही देशाने अफगाणांची परीक्षा घेऊ नये. इतिहासात अफगाण लोक कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहिले नाहीत हे सिद्ध झाले आहे. अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नांगरहारमधील लोक रविवारी प्रांतातील घनिखिल जिल्ह्यात मोठ्या संख्येने जमले होते.