अमेरिकेतील (America) एका आई आणि वडिलांना आपल्या स्वत:च्या मुलीची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे जैझमीन (Jazmine) असे नाव असलेली ही मुलगी फक्त 10 आठवड्यांची होती. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या मुलीच्या शरीरात तब्बल 96 जागी फ्रॅक्चर आढळून आले होते. वेळेपूर्वीच या मुलीचा जन्म झाला होता, त्यामुळे तिला बराच काळ हॉस्पिटलमध्ये राहावे लागले होते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर 12 दिवसांनी या मुलीचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणात जासुसांची मदत घेतली होती, त्यांच्या मते या पालकांनीच मुलीची हत्या केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ह्यूस्टन (Houston) हॉस्पिटलमध्ये जेव्हा या मुलीला आणण्यात आले, तेव्हाच या मुलीचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी या मुलीच्या शरीराचे पोस्टमॉर्टम केले. तेव्हा मुलीच्या डोक्यावर आघात झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. जेव्हा जेव्हा हे बाळ रडत असे तेव्हा तेव्हा तिचे पालक रागाने तिला मारत असत. याचे प्रमाण इतके वाढले होते की, यामुळे या मुलीच्या शरीरात तब्बल 96 फ्रॅक्चर असल्याचे डॉक्टरांना आढळून आले.
15 जुलै 2018 रोजी या मुलीचा मृत्यू झाला. 24 वर्षीय जेसन पॉल रॉबिन आपल्या मुलीचा खून केल्याबद्दल दोषी आढळून आला आहे. तसेच त्याची पत्नी आणि मुलीची आई कॅथरिनच्या विरूद्ध मुलीची योग्य काळजी न घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.