फेसबुक (Photo Credits: ANI)

प्रत्येक वर्षाच्या डिसेंबर महिन्यात Yahoo Finance, बाजारातील कामगिरीच्या आधारे वर्षातील सर्वोत्तम कंपनीची निवड करते. 2021 मध्ये, Microsoft (MSFT) ने $2 ट्रिलियन मार्केट कॅपिटलायझेशन मार्क स्मॅश करून आणि 16 डिसेंबर पर्यंत त्यांच्या स्टॉकच्या किमतीत 53% वाढ करून, यंदाच्या सर्वोत्कृष्ट कंपनीचा मुकुट प्राप्त केला आहे. दुसरीकडे फेसबुक (Facebook), ज्याला नुकतेच ‘मेटा’ म्हणून पुनर्ब्रँड केले गेले आहे, वर्षातील सर्वात वाईट कंपनी ठरली आहे. याहू फायनान्सवर 4 आणि 5 डिसेंबर रोजी ‘ओपन-एंडेड’ सर्वेक्षण प्रकाशित करण्यात आला, ज्यामध्ये 1,541 प्रतिसादकर्त्यांनी भाग घेतला.

याहू फायनान्सने नमूद केले आहे की, ‘फेसबुकला या वर्षी वादांचा सामना करावा लागला आहे. जानेवारीपासून, मेटा-मालकीचे व्हॉट्सअॅप (WhatsApp) या मेसेजिंग अॅपने नवीन गोपनीयता धोरण जाहीर केल्यावर कंपनी मोठ्या वादात सापडली. व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की ते वापरकर्त्याची माहिती संकलित करतील आणि वापरकर्त्याच्या चांगल्या अनुभवासाठी ती माहिती थर्ड पार्टी अॅप्ससह शेअर केली जाईल. त्यावेळी अॅपने वापरकर्त्यांसमोर इतर कोणताही पर्याय ठेवला नाही, परंतु नंतर दबावाखाली धोरणात सुधारणा केली.’

पुढे म्हटले आहे, ‘त्याचप्रमाणे, फेसबुकचे माजी कर्मचारी फ्रान्सिस हॉगेन यांनी कंपनीची काही अंतर्गत दस्तऐवजांची मालिका लीक केल्यानंतर कंपनीच्या पद्धतीवर अनेक प्रश्न उभे राहिले. असे दिसून आले की मेटा-मालकीच्या Instagram चा किशोरवयीन मुलींवर नकारात्मक प्रभाव पडला, परंतु कंपनीने समस्येचे निराकरण करण्यासाठी जवळजवळ काहीही केले नाही.’ याहू फायनान्सने हेही हायलाइट केले की, ‘काही लोकांचे म्हणणे आहे की, फेसबुकने त्यांच्या व्यासपीठावरील भाषणावर अधिक नियंत्रण ठेवले आणि त्यांचा आवाज दाबला.’ (हेही वाचा: महाराष्ट्र, कर्नटक राज्यातील 500 गावे व्हाट्सअ‍ॅपने घेतली दत्तक)

टीकाकारांनी फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला द्वेषयुक्त भाषणास प्रतिबंध न केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. अशा अनेक कारणांमुळे फेसबुक यंदाची सर्वात वाईट कंपनी ठरली आहे. दरम्यान, एका प्रतिवादीने असे सुचवले की कंपनीने आपल्या निष्काळजीपणाबद्दल औपचारिक माफी मागावी आणि त्याचे नुकसान भरून काढण्यात मदत करण्यासाठी नफ्यातील महत्त्वपूर्ण भाग फाउंडेशनला दान करावा.