World's Largest Mobile Operator: मुकेश अंबानी यांच्या Reliance Jio चा नवा विक्रम; चिनी कंपनीला मागे टाकून बनला डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर
Reliance Jio 5G Service | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

World's Largest Mobile Operator: दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने डेटा वापराच्या बाबतीत नवा विक्रम रचला आहे. भारतीय दूरसंचार क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर, रिलायन्स जिओने डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत चायना मोबाईलला मागे टाकले आहे. रिलायन्स जिओ डेटा ट्रॅफिकमध्ये जगातील नंबर वन कंपनी बनली आहे. गेल्या तिमाहीत जिओने एकूण डेटा ट्रॅफिक 40.9 एक्साबाइट्स नोंदवले गेले.

यासह डेटा ट्रॅफिकमध्ये आतापर्यंत जगातील नंबर वन कंपनी असलेली चायना मोबाईल दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. या तिमाहीत त्याच्या नेटवर्कवरील डेटाचा वापर 40 एक्झाबाइट्सपेक्षा कमी राहिला. डेटा वापराच्या बाबतीत चीनची आणखी एक कंपनी चायना टेलिकॉम तिसऱ्या स्थानावर आहे, तर भारताची एअरटेल चौथ्या स्थानावर आहे.

जगभरातील टेलिकॉम कंपन्यांचा डेटा ट्रॅफिक आणि ग्राहक आधारावर लक्ष ठेवणाऱ्या TAfficient ने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. याआधी 2018 मध्ये भारतातील एकूण मोबाइल डेटा ट्रॅफिक एका तिमाहीत केवळ 4.5 एक्साबाइट्स होता. 5जी सेवा सुरू केल्यानंतर, रिलायन्स जिओचा डेटा वापर मागील वर्षाच्या तुलनेत 35.2 टक्क्यांनी वाढला आहे. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे जिओ 5G नेटवर्क आणि जिओ एयर फायबरचा (Jio Air Fiber) विस्तार होय. (हेही वाचा: Apple Jobs: ॲपल भारतामध्ये करणार बंपर नोकर भरती; पुढील तीन वर्षात पाच लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता)

रिलायन्स जिओच्या तिमाही निकालांनुसार, Jio True 5G नेटवर्कमध्ये 108 दशलक्ष ग्राहक जोडले गेले आहेत आणि जिओच्या एकूण डेटा ट्रॅफिकपैकी सुमारे 28 टक्के डेटा आता 5जी नेटवर्कवरून येत आहे. दुसरीकडे, जिओ एअर फायबरनेही देशभरातील 5,900 शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली आहे. कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या तिमाही निकालांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जिओ नेटवर्कवर प्रति ग्राहक मासिक डेटा वापर 28.7 GB पर्यंत वाढला आहे, जो तीन वर्षांपूर्वी फक्त 13.3 GB होता.