Vodafone Idea Merger Representational Asset (Photo Credit: TheIndianWire)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वैधानिक थकबाकीनंतर, मार्च 2020 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात, देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आयडियाला (Vodafone Idea) 73,878 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. बुधवारी याबाबत माहिती देण्यात आली. कोणत्याही भारतीय कंपनीचे आतापर्यंतचे हे सर्वात मोठे वार्षिक नुकसान आहे. नॉन-टेलिकॉम उत्पन्नाचा (Non-Telecom Revenues) समावेश देखील वैधानिक थकबाकीच्या मोजणीत करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानंतर कंपनीला 51,400 कोटी रुपये देणे आहे. आता कंपनीने म्हटले आहे की, या दायित्वामुळे कंपनीचे काम सुरू ठेवण्याबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे.

व्होडाफोन आयडियाने (VIL) नियामक फायलींगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मार्च तिमाहीत त्यांचा निव्वळ तोटा 11,643.5 कोटी रुपये होता, तर मागील वर्षातील याच तिमाहीत 4,881.9 कोटी रुपये तोटा झाला होता. ऑक्टोबर-डिसेंबर 2019 या तिमाहीत 6,438.8 तोटा झाला होता. कंपनीने म्हटले आहे की मार्च 2020 च्या तिमाहीत ऑपरेशनमधून मिळणारा महसूल 11,754.2 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला 73,878.1 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. व्होडाफोन आयडियाला 2018-19 या आर्थिक वर्षात 14,603.9 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. (हेही वाचा: मुकेश अंबानी यांच्या जिओमध्ये 9 आठवड्यात अकरावी गुंतवणूक; सौदी अरेबियाच्या 'पीआयएफ'ने 11,367 कोटींमध्ये विकत घेतली 2.32 टक्के भागीदारी)

मार्च तिमाहीत कंपनीचा ग्राहक वर्ग 291 दशलक्ष झाला आहे. डिसेंबरमध्ये तो 304 दशलक्ष होता. एजीआरच्या थकबाकीवर कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी एकूण 46,000 कोटींची थकबाकी मान्य केली आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे, इंडस-इंफ्राटेल विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर व्होडाफोन आयडियाची, इंडस टॉवर्समधील 11.15 टक्के हिस्सेदारीच्या कमाईची योजना आहे. व्होडाफोन आयडियाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रविंदर टक्कर म्हणाले की, ‘नेटवर्क एकत्रिकरण तसेच 4 जी कव्हरेज आणि त्याची क्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित केल्याने, ग्राहकांशी आमचा अनुभव सुधारला आहे.’