Jio-PIF Deal: मुकेश अंबानी यांच्या जिओमध्ये 9 आठवड्यात अकरावी गुंतवणूक; सौदी अरेबियाच्या 'पीआयएफ'ने 11,367 कोटींमध्ये विकत घेतली 2.32 टक्के भागीदारी
Mukesh Ambani | Reliance Jio | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries), गेल्या दोन महिन्यापासून भागीदारांच्या बाबतीत अतिशय उत्तम कामगिरी करत, जाणून काही एक नवीन विक्रमच नोंदवला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने गुरुवारी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये (Jio Platforms) 11 व्या गुंतवणूकीची घोषणा केली आहे. गेल्या 9 आठवड्यांत सलग 10 गुंतवणूकदारांनंतर सौदी अरेबियाचा सॉवरेन वेल्थ फंड पीआयएफ 2.32 टक्के भागभांडवलसाठी, जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 11,367 कोटी रुपये गुंतवणार आहे. 22 एप्रिलनंतर जिओ प्लॅटफॉर्ममधील ही 11 वी गुंतवणूक आहे. याबरोबरच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या या युनिटने गेल्या 9 आठवड्यांत जागतिक गुंतवणूकदारांना 24.7 टक्के हिस्सा विकून 1.15 लाख कोटी रुपये गोळा केले आहेत.

आतापर्यंत जिओ प्लॅटफॉर्ममधील 24.7 टक्के हिस्सेदारीच्या तुलनेत एकूण 1,15,693.95 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. जिओमध्ये गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांच्या यादीमध्ये, जगभरातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या सर्वाधिक गुंतवणूकदारांचा समावेश आहे. पीआयएफने जिओचे इक्विटी मूल्यांकन 4.91 लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइझचे मूल्यांकन 5.16 लाख कोटी रुपये असल्याचे अनुमान लावले आहे. अलीकडे खासगी इक्विटी कंपन्या एल कॅटरटन आणि टीपीजीने जिओमध्ये गुंतवणूक जाहीर केली आहे.

आरआयएलच्या निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंत फेसबुक, सिल्व्हर लेक पार्टनर्स, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक, केकेआर, मुबाडला, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, टीपीजी, एल. कॅटरटन आणि पीआयएफ यांनी जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केली आहे. त्यात फेसबुकने सर्वाधिक 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकीद्वारे जिओ प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुकला 9.99% हिस्सा मिळेल. 22 एप्रिल रोजी जिओ आणि फेसबुक यांमधील करार झाला होता. (हेही वाचा: Reliance Jio मध्ये KKR ची 11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक, एका महिन्यात जिओ प्लॅटफॉर्मची पाचवी मोठी डील)

पीआयएफशी झालेल्या या करारानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, ‘गेल्या अनेक दशकांपासून रिलायन्स इंडस्ट्रीजचे सौदी अरेबियाशी चांगले संबंध आहेत. तेलाच्या अर्थव्यवस्थेच्या पलीकडे जात, आता हे संबंध नवीन तेलाच्या म्हणजेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही वाढत आहेत. मी सौदी अरेबियाच्या किंगडममध्ये पीआयएफद्वारे केलेल्या आर्थिक परिवर्तनाचा मोठा चाहता आहे. जिओ प्लॅटफॉर्मचा भागीदार म्हणून मी पीआयएफचे स्वागत करतो.’