एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचे (Twitter) अधिग्रहण केल्यानंतर कंपनीमधील कर्मचाऱ्यांची छाटणी करण्यात आली आहे. ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी भारतातील कंपनीच्या जवळपास सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. असे सांगण्यात येत आहे की, भारतात सुमारे 250 ट्विटर कर्मचारी काम करत होते, ज्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील जवळपास संपूर्ण क्यूरेशन संघाला काढून टाकण्यात आले आहे.
ही टीम ट्विटर मोमेंट्स फीचरसाठी कंटेंट तयार करत असे. याशिवाय, कम्युनिकेशन, ग्लोबल कंटेंट पार्टनरशिप्स, सेल्स आणि रेव्हेन्यू, इंजीनिअरिंग आणि प्रॉडक्ट संघातीलही अनेक लोकांना काढून टाकण्यात आले आहे. एका सूत्राने सांगितले की या संघातील संपूर्ण किंवा 50 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले गेले असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. हे लोक कंपनीमध्ये पूर्णवेळ कामावर नव्हते. दुसरीकडे 100 पेक्षा जास्त भाषा असलेल्या देशात ट्विटर आपल्या कमी कर्मचार्यांद्वारे व्यासपीठावरील संवाद कसा नियंत्रित करेल हे स्पष्ट नाही.
BREAKING: Bloomberg reports that Twitter has fired 90% of its employees in India
— The Spectator Index (@spectatorindex) November 7, 2022
कंपनीने कर्मचाऱ्यांना मेल पाठवून कळवले होते की, शुक्रवारी लोकांना कामावरून कमी करण्याची प्रक्रिया होईल. त्यानुसार भारतातही कर्मचाऱ्यांना काढून टाकले गेले. मस्क ट्विटरचा नवा मालक होताच, त्याने प्रथम भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह कंपनीच्या चार बड्या अधिकाऱ्यांना काढून टाकले. यानंतर ट्विटरमधील अनेक लोकांना काढून टाकण्यात येईल, असे मानले जात होते आणि तसेच घडले. (हेही वाचा: Elon Musk: ट्विटरने 7,500 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवे प्रमुख एलन मस्क म्हणतात 'Unfortunately, No Choice')
दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या छाटणीनंतर आता ट्विटरने काढलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना परत बोलावले आहे. यातील काही कर्मचाऱ्यांना चुकून काढून टाकण्यात आले असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. सूत्रांच्या हवाल्याने ब्लूमबर्गच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, व्यवस्थापनाने काही लोकांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले होते. आता कंपनीला हे कळत आहे की मस्कचे व्हिजन पुढे नेण्यासाठी या कर्मचाऱ्यांची गरज आहे. म्हणून आता त्यांना परत बोलावण्यात येत आहे.