Threads App (Image Credit - Mukul Sharma)

फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग (Mark Zukarbag) यांनी ट्विटरला (Twitter) टक्कर देण्यासाठी आपले नवीन अ‍ॅप लाँच केले असून ते गुरुवारी लाईव्ह होणार असल्याची माहिती मिळाली आहे. थ्रेड्स नावाचे (Threads App) हे अ‍ॅप अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे, ते इन्स्टाग्रामशी लिंक केले जाईल. या नव्या अ‍ॅपचा डॅशबोर्ड हा ट्विटर सारखाच दिसत आहे. मेटाचा हा मायक्रो ब्लॉगिंग अ‍ॅप आहे. ट्विटरला टक्कर देण्यासाठी हा अ‍ॅप आणला असल्याचे म्हटले जात आहे. (हेही वाचा - JioBharat V2 4G Phone: खुशखबर! रिलायन्स जिओने लॉन्च केला आपला नवीन 4जी फोन; किंमत फक्त 999 रुपये, जाणून घ्या सविस्तर)

गेल्या काही दिवसांपासून ट्विटरचे मालक इलॉन मस्क आणि झुकरबर्ग मधील शीतयुद्ध पहायला मिळाले असून ट्विटरला मात देण्यासाठी मेटाकडून हे पाऊल उचलले गेल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान जेव्हापासून मस्कने ट्विटरची सुत्र हाती घेतली आहे तेव्हा पासून ट्विटरवर त्यांने अनेक बदल केल्याचे पहायला मिळत आहे. ट्विटरच्या ब्ल्यू टिक साठी पैसे आकारणे, ट्विटरचे सबक्रीप्शन, ट्विटरची शब्द मर्यादा असे अनेक निर्णय त्याचे वादग्रस्त ठरले आहे.

मेटाच्या थ्रेड्स अ‍ॅपवरून असे दिसते की ही एक विनामूल्य सेवा असेल - आणि वापरकर्ता किती पोस्ट पाहू शकतो यावर कोणतेही निर्बंध नसणार आहेत. अ‍ॅप स्टोअरवरील वर्णनात असे म्हटले आहे की, "थ्रेड्स म्हणजे जिथे समुदाय एकत्र येतात आणि आज तुम्हाला महत्त्वाच्या असलेल्या विषयांपासून ते उद्या काय ट्रेंडिंग होईल अशा प्रत्येक गोष्टीवर चर्चा करतात."