टेक कंपन्यांमध्ये (Tech Firms Lay Off ) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सन 2023 हे वर्ष अत्यंत हानिकारक ठरले. मेटा ( Meta), बीटी (BT), व्होडाफोन (Vodafone) आणि इतरही अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले. इतकेच नव्हे तर टाळेबंदी करत कर्मचारी कपातीचे धोरण यापुढेही कायम ठेवण्याचे कंपन्यांनी संकेत दिले आहेत. परिणामी आगामी काळात अनेकांना नोकरी जाण्याची भीती सतावते आहे. जागतीक पातळीवरील आकडेवारीचा अभ्यास करता आतापर्यंत सुमारे 2 लाख टेक कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे, असे विविध अहवाल सांगतात.

टाळेबंदी दरम्यान कर्मचारी कपातीवर बारीक लक्ष ठेवणारी आणि त्याची संख्यात्मक नोंद ठेवणाऱ्या लेऑफ ट्रॅकिंग साइट Layoffs.fyi च्या डेटानुसार, 695 टेक कंपन्यांनी या वर्षात आतापर्यंत सुमारे 1.98 लाख कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्या तुलनेत 1,046 टेक कंपन्यांनी 2022 मध्ये 1.61 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले.

एकट्या जानेवारी (2021) मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे 1 लाख कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या. ज्यात Amazon, Microsoft, Google, Salesforce आणि इतर कंपन्यांचा वाटा अधिक मोठा आहे. 2022 मध्ये आणि या वर्षी मे (2023) पर्यंत सुमारे 3.6 लाख तंत्रज्ञान कर्मचार्‍यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

सर्वात बड्या समजल्या जाणाऱ्या टेक कंपन्यांनी टाळेबंदी सुरुच ठेवल्यने कर्मचाऱ्यांची धास्ती वाढवली आहे. खास करुन कोविड-19 नंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जगभरात आर्थिक विश्वाला मोठा हादरा बसला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्ताननुसार, मेटा (पूर्वीचे फेसबुक) पुढील आठवड्यात नोकर कपातीच्या तिसर्‍या फेरीला सुरुवात करणार आहे. ज्यामुध्ये आणखी कर्मचार्‍यांना काढून टाकण्यास सुरुवात होईल. मेटातून कमी केल्या जाणार्या कर्मचाऱ्यांच्या संख्येची नेमकी पुष्टी झालेली नसली तरी या फेरीत कंपनी अंदाजे 6,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकेल अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा, Biggest Layoffs 2023: टेक विश्वात सर्वात मोठी टाळेबंदी, जाणून घ्या कोणकोणत्या कंपन्यांनी आणले कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर)

Amazon India ने या महिन्यात आपल्या क्लाउड विभागातील AWS तसेच पीपल एक्सपिरियन्स अँड टेक्नॉलॉजी सोल्युशन्स (PXT) किंवा HR आणि सपोर्ट वर्टिकलमधून सुमारे 400-500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

फिनटेक युनिकॉर्न Zepz 420 कर्मचारी किंवा 26 टक्के कर्मचारी काढून टाकत आहे. यूके दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज बीटी ग्रुपने दशकाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणावर 55,000 नोकऱ्या कमी करण्याची योजना जाहीर केली आहे.

जागतिक दूरसंचार वाहक व्होडाफोनने म्हटले आहे की ते मुख्यालय आणि स्थानिक बाजार दोन्ही “सुलभीकरण” करण्याच्या उद्देशाने पुढील तीन वर्षांत 11,000 नोकर्‍या कमी करण्याची योजना आखत आहेत.

दरम्यान, मायक्रोसॉफ्ट या वर्षी वरिष्ठ नेत्यांसह पगारदार कर्मचार्‍यांना कोणतीही पगारवाढ देणार नाही कारण जागतिक स्थूल आर्थिक परिस्थिती बिग टेकला त्रासदायक ठरत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)