
Infosys Layoffs: आर्थिक मंदीमुळे जगभरातील अनेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. आता भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसने शेकडो नवीन कर्मचार्यांना अंतर्गत फ्रेशर असेसमेंट (एफए) परीक्षेत अपयशी ठरल्याने त्यांना काढून टाकले आहे. बिझनेस टुडेच्या मते, फ्रेशर्ससाठी इंटरनल फ्रेशर असेसमेंट टेस्ट घेण्यात आली होती, जे कर्मचारी उत्तीर्ण झाले नाहीत त्यांना काढून टाकण्यात आले आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये कंपनीत सामील झालेल्या एका नवीन व्यक्तीने सांगितले की, मी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये इन्फोसिसमध्ये रुजू झालो होतो. माझ्या टीममधील 150 लोकांपैकी फक्त 60 जण एफए परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले आहेत. बाकीच्या सर्वांना दोन आठवड्यांपूर्वी काढून टाकण्यात आले होते. अंतर्गत चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामुळे 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. (हेही वाचा - Byjus Layoff Again: बायजूच्या आणखी 1000-1200 कर्मचाऱ्यांना नारळ, आर्थिक मंदीचे दिले कारण)
600 फ्रेशर्संना कामावरून काढून टाकण्यात आले
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी एफए परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर 208 फ्रेशर्सना बाहेर काढण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांत एफए परीक्षेत नापास झालेल्या सुमारे 600 फ्रेशर्सना कंपनीने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नोकरीवरून काढलेल्या लोकांच्या संख्येची पुष्टी करण्यासाठी इन्फोसिसशी संपर्क साधण्यात आला, परंतु कंपनीने ते उघड करण्यास नकार दिला. मात्र, कंपनीच्या प्रतिनिधीने असा दावा केला आहे की, अंतर्गत मूल्यांकन चाचणी उत्तीर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
Infosys कडून मोठ्या प्रमाणात टाळेबंदीची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा शेकडो फ्रेशर्स ऑफर लेटर मिळाल्यानंतर 8 महिन्यांहून अधिक काळ कंपनीमध्ये सामील होण्याची प्रतीक्षा करत आहेत. या बातमीनंतर ऑनबोर्डिंगच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी, आयटी कंपनी विप्रोनेही अंतर्गत चाचण्यांमध्ये अयशस्वी झाल्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, विप्रोने सुमारे 800 फ्रेशर्सना कामावरून काढले होते. कंपनीने दावा केला की 452 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.