जगभरात येऊ घातलेल्या जागतिक मंदीची (Global Recession) चिन्हे हळूहळू दिसू लागली आहेत. नुकतेच सुप्रसिद्ध आयटी कंपन्या विप्रो, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा (Wipro, Infosys and Tech Mahindra) यांनी फ्रेशर्सना ऑफर लेटर देऊन त्यांची नियुक्ती रद्द केल्याची बातमी आली होती. आता एका अहवालानुसार, फेसबुकची (Facebook) मूळ कंपनी मेटा आपल्या सुमारे 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे.
क्रंचबेस (CrunchBase) ने नुकताच एक भयावह अहवाल जारी केला, ज्यानुसार जगभरातील IT क्षेत्राशी संबंधित 300 हून अधिक कंपन्या आणि नवीन स्टार्टअप्सनी एप्रिल 2022 पर्यंत 43 हजारांहून अधिक कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही फक्त सुरुवात होती, एप्रिलपासून आतापर्यंत आयटी कंपन्या त्यांचे अनेक कर्मचारी कमी करत आहेत.
मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या मेटा इंकने सूचित केले आहे की, ते कंपनीमधून सुमारे 15 टक्के हेडकाउंट काढून टाकतील. आकडेवारी पाहिली तर सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. फेसबुकवर नवीन नोकरभरती आधीच बंद करण्यात आली आहे. या खुलाशानंतर, मेटाच्या शेअरची किंमत प्रति शेअर $ 380 च्या जवळ पोहोचली. गेल्या वर्षभरात कंपनीचा शेअर 60 टक्क्यांनी घसरला आहे.
मार्क झुकेरबर्गने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्यांना अपेक्षा होती की आगामी काळात अर्थव्यवस्था वाढेल आणि ते स्थिरतेकडे वाटचाल करू शकतील, परंतु सध्याची परिस्थिती पाहता तसे दिसत नाही. त्यामुळे ते काहीतरी वेगळे नियोजन करत आहेत. (हेही वाचा: फ्रेशर्सना दिलेले ऑफर लेटर Wipro, Infosys आणि Tech Mahindra कडून रद्द; मुलाखती घेऊन नोकरभरती थांबवली)
मागील महिन्यातच मायक्रोसॉफ्टने आधी 200 आणि नंतर 1800 लोकांना नोकरीवरून काढून टाकण्याची माहिती दिली होती. यानंतर अॅपलनेही आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली. याच क्रमाने गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही कर्मचाऱ्यांना इशारा दिला होता की, कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार उत्पादन होत नाही, त्यामुळे कंपनीला लवकरच कर्मचाऱ्यांची कपात करावी लागू शकते.